Breaking News

भाजपला पाच महिन्यात 80 हजार कोटींच्या देणग्या - ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे.

नवी दिल्ली : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी पुन्हा भ्रष्टाचाराविरोधात रणशिंग फुंकले असून, त्यांनी केंद्रात सत्ताधारी असणा़र्‍या मोदी सरकारला लक्ष्य करत, भाजपला पाच महिन्यात तब्बल 80 हजार कोटींच्या देणग्या मिळाल्याचा खळबळजनक आरोप केला आहे. अण्णा हजारे यांनी भाजपला भ्रष्टाचाराच्या मुद्दयावरून घेरणार असल्याचे यापूर्वींच स्पष्ट केले आहे. 


त्यामुळे अण्णा हजारे यांच्या आरोपाला विशेष महत्व प्राप्त झाले आहे. फोर्ब्ज या प्रसिद्ध कालिकाचा संदर्भ घेत अण्णा हजारेंनी भारतातील भ्रष्टाचारावर शरसंधान केले आहे. भ्रष्ट देशांच्या सूचित भारताचा क्रमांक सर्वात वरचा आहे, असे या नियतकालिकाचे म्हणणे असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले. गेली तीन वर्षे आपण शांत होतो. नव्या सरकारला भ्रष्टाचार दूर करण्यासाठी तेवढा वेळ देणे आवश्यक होते. तथापि, भाजपचे सरकारही पूर्वीच्याच मार्गाने चालले आहे. य सरकारच्या कार्यकाळात भ्रष्टाचार कमी झालेला नाही. 

त्यामुळे पुन्हा रस्त्यावर उतरून आंदोलन केल्याखेरीज गत्यंतर नाही, असे ही त्यांनी स्पष्ट केले. सर्वसामान्यांच्या समस्या सुटलेल्या नाहीत. देशातील शेतकरी दुःख भोगत आहे. बँका त्यांना कर्ज देतात, पण मनमानी पद्धतीने व्याज लावतात. रिझर्व्ह बँकेने सर्व शेतक़र्‍यांसाठी विशिष्ट व्याजदर ठरविला पाहिजे. कर्जफेड न करता आल्यामुळे शेतकरी मोठया प्रमाणावर आत्महत्या करतात. त्यांना त्यांच्या पिकाची योग्य किंमत मिळत नाही. या सर्व समस्यांना सरकारची चुकीची धोरणे जबाबदार आहेत. म्हणून आंदोलनाचा मार्ग स्वीकारला जाणार आहे, असे स्पष्टीकरण त्यांनी दिले.