Breaking News

मान्यता रद्द असलेल्या गुरुकुल शाळेने लाटला 2.79 कोटी रुपयांचा निधी

सोलापूर, दि. 16, डिसेंबर - कुसमोड ता. माळशिरस इसबावी ता. पंढरपूर येथील गुरूकुल प्रायमरी अ‍ॅण्ड सेकंडरी स्कूलने विद्यार्थ्यांना कोणत्याही मूलभूत सुविधा देता शासनाचे कोट्यवधी रुपयांचे अनुदान हडप केल्याचे चौकशीत समोर आले आहे. 2015-16 2016-17 या दोन वर्षात शासनाचे 2 कोटी 79 लाख रुपयांचे अनुदान लाटल्याचे समोर आले आहे. 


आदिवासी विकास प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी यांनी उपायुक्तांच्या आदेशानुसार केलेल्या चौकशीमध्ये 2.79 कोटी अनुदान लाटल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी दोन्ही वर्षामध्ये प्रत्यक्षात किती विद्यार्थी शिक्षण घेत होते, किती विद्यार्थ्यांना या शासन अनुदानाचा लाभ मिळाला ? याची तपासणी सुरू असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. प्रवेश घेतल्यानंतर संस्थेने शासनाकडे विद्यार्थ्यांची ऑनलाइन नोंदणी केली आहे. 

मात्र विद्यार्थ्यांची नोंदणी ऑनलाइन केली असल्याने अनुदान मिळविलेल्या दोन्ही वर्षात प्रत्यक्षात संस्थेत किती विद्यार्थी शिक्षण घेत होते, किती जणांची नोंदणी केली, त्या विद्यार्थ्यांना संस्थेकडून कोणत्या सुविधा दिल्या याची चौकशी सुरू आहे. मान्यता रद्द केलेल्या संस्थेने शासनाकडून घेतलेले अनुदानाबाबत संशय निर्माण झाल्याने चौकशी सुरू आहे. आदिवासी विकास विभागाचे उपायुक्त एम.ए. शेख यांनी गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले आहेत, त्यानुसार कारवाई करण्यात येणार असल्याचे प्रकल्प अधिकारी सोनकवडे यांनी स्पष्ट केले.