Breaking News

छत्रपती शिवाजी महाराजांच्या अरबी समुद्रातील स्मारकाचे काम मार्गी लागले


राजगड किल्ल्यावर जाण्यासाठी गुंजवणी नदीवर असलेल्या पुलाची उंची वाढविण्याच्या कामाची निविदा अर्थसंकल्पात तरतूद केल्यानंतर त्याच दिवशी काढली जाईल. तत्पूर्वी निविदा काढण्याच्या सर्व तांत्रिक बाबी पूर्ण केल्या जातील, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्वजनिक उपक्रम वगळून) चंद्रकांत पाटील यांनी आज विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली.
साखरगाव जवळील गुंजवणी नदीवरील पूल धोकादायक झाल्याबाबतचा प्रश्न सदस्य संग्राम थोपटे यांनी उपस्थित केला होता. त्याला उत्तर देताना श्री. पाटील म्हणाले की, हा पूल किती उंच केला पाहिजे हे तपासून त्याचे अंदाजपत्रक तयार करण्यात येईल. येणाऱ्या अर्थसंकल्पामध्ये या कामाचा समावेश करुन ज्या दिवशी अर्थसंकल्प मंजूर केला जाईल, त्याच दिवशी या कामाची निविदा प्रसिद्ध केली जाईल. तत्पूर्वी सर्व प्रक्रिया करुन ठेवण्यात येईल, असे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.

यावेळी झालेल्या चर्चेदरम्यान श्री. पाटील यांनी सांगितले की, राज्यातील 400 पुलांवर सॉफ्टवेअर बसविण्यात आले असून त्याच्या मदतीने पावसाळ्यात पाण्याची पातळी वाढल्यानंतर पुलावरुन पाणी वाहून जात असेल तर जिल्हा प्रशासनाला एसएमएस जातो. त्यानंतर संबंधित जिल्हाधिकारी या पुलावरील वाहतूक बंद करतात.

या प्रश्नाच्या चर्चेदरम्यान श्री. पाटील यांनी अरबी समुद्रातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाच्या कामासाठी सर्व परवानग्या मिळाल्या असून या कामासाठी तीन निविदा प्राप्त झाल्या आहेत. त्यातील सर्वात कमी दराच्या निविदाधारकाशी वाटाघाटी करुन ते मंत्रिमंडळासमोर सादर केले जाईल. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचे काम मार्गी लागले असल्याचे श्री. पाटील यांनी यावेळी सांगितले.