Breaking News

गॅस सिलिंडरचा स्फोट होऊन 17 झोपड्या आगीच्या भक्ष्यस्थानी

ठाणे, दि. 12, डिसेंबर - येथील वर्तकनगर परिसरातील भीमनगर झोपडपट्टीत आज दुपारी गॅस सिलिंडरचा स्फोट होऊन 17 झोपड्या आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्या. या आगीत कोणीही जखमी झाले नसले तरी रहिवाशांची मोठी धावपळ झाली.


आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अल्पावधीत अग्नीशमन दलाच्या 4 गाड्या, एक रुग्णवाहिका व एक कार्डीयाक रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाल्या. रहिवासी व अन्य गॅस सिलिंडर सुरक्षित स्थळी स्थलांतरित करून त्यानंतर अग्नीशमन दलाकडून आगीवर नियंत्रण आणण्यासाठी कारवाई करण्यात आली.

दरम्यान घटनास्थळी महापौर मिनाक्षी शिंदे यांनी भेट दिली. या ठिकाणी प्रभावित झालेल्या रहिवाशांचे तूर्तास नजीकच्या महापालिका शाळेत पुनर्वसन करण्यात येईल. घरे उपलब्ध होताच कायमस्वरूपी पुनर्वसन केले जाईल, असे आश्‍वासन महापौर शिंदे यांनी दिले.