Breaking News

उत्तर प्रदेश मनपा निवडणुकीत भाजपची सरशी 16 पैकी एकूण 14 महापालिकांमध्ये भाजपाचा महापौर

नवी दिल्ली : उत्तर प्रदेशमधील महापालिका निवडणुकीत भाजपचा दणदणीत विजय झाला असून, 16 पैकी एकूण 14 महापालिकांमध्ये भाजपाचा महापौर विराजमान होणार हे आता स्पष्ट झालं आहे. तर पैकी एका ठिकाणी बसपा, तर एके ठिकाणी समाजवादी समर्थित उमेदवाराचा विजय झाला आहे. या निवडणुकीत काँग्रेसचा सुपडा साफ झाला असून, महापौर पदाच्या निवडणुकीत काँग्रेसला खातंही उघडता आलं नाही. विशेष म्हणजे, राहुल गांधींच्या अमेठी मतदारसंघात काँग्रेसला जोरदार झटका बसला आहे. काँग्रेसची दयनीय अवस्था झालेली असताना दुसरीकडे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या प्रभागातही भाजप उमेदवाराचा पराभव झाला आहे. 


मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या गोरखपूर महापालिकेतील वॉर्ड क्रमांक 68 मधून अपक्ष उमेदवार नादिरा खातून यांनी भाजपच्या माया त्रिपाठींचा पराभव केला. भाजपने कानपूर, झांसी, मेरठ, वाराणसी, लखनऊ, आग्रा, गोरखपूर-मुरादाबाद, अलीगढ आदी महापालिकांमध्ये आपला झेंडा फडकवला आहे. तर बरेलीमध्ये बसपा, आणि गाझीयाबादमध्ये समाजवादी पक्षाने समर्थन दिलेला अपक्ष उमेदवार महापौरपदाच्या निवडणुकीत विजयी झाला आहे. नगरसेवक निवडीमध्येही भाजपनेच बाजी मारली आहे. 

भाजपचे एकूण 552, काँग्रेसचे 96, समाजवादी पक्षाचे 186, बसपाचे 137, आणि अपक्ष 214 नगरसेवक निवडणून आले आहेत. निवडणूक निकालानंतर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी काँग्रेसवर जोरदार हल्ला चढवला आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी पत्रकार परिषद घेऊन, जे लोक गुजरात विधानसभा निवडणुकीत मोठ-मोठ्या बाता मारत आहेत. त्यांना मनपा निवडणुकीत खाते देखील उघडता आले नाही, अशी टीका केली आहे.