Breaking News

मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीमुळे 1 हजार 376 रुग्णांना मिळाले नवे जीवन


हृदयरोग शस्त्रक्रिया, कर्करोग यासारख्या दुर्धर आजारावर समाजातील अत्यंत गरिब व गरजवंत रुग्णांना उपचारासाठी मदत व्हावी यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुरु केलेल्या मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीमुळे विभागातील सुमारे 1 हजार 376 गरिब रुग्णांना अत्यंत खर्चिक वैद्यकीय सेवेचा लाभ मिळाल्यामुळे त्यांना या योजनेमुळे जीवनदान मिळाले आहे. या योजनेंतर्गत नामवंत रुग्णालयात शस्त्रक्रिया व उपचार करण्यासाठी गरिब रुग्णांच्या शस्त्रक्रिया व उपचाराच्या खर्चापोटी 17 कोटी 23 लाख 59 हजार रुपयाचा निधी उपलब्ध करुन देण्यात आला आहे.
हृदयरोग, कर्करोग, ट्रामा व सीव्हीई या मेंदूच्या आजाराचे रुग्णांना उपचार मिळावा यासाठी मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी मुंबई व नागपूर येथे सुरु करण्यात आली आहे. समाजातील अत्यंत गरिब आणि 1 लाख रुपयापेक्षा ज्यांचे उत्पन्न कमी आहे अशांना दुर्धर आजारावर उपचार करता यावा यासाठी मुख्यमंत्री सहायता निधीमधून मदत देण्यात येते.

समाजातील अत्यंत गरिब व दुर्धर अशा आजारातील रुग्णांना उपचारासाठी सहाय्य मिळावे या हेतूने शासनाने ही योजना सुरु केली आहे. गरिब रुग्णांना शस्त्रक्रियेसाठी येणाऱ्या प्रचंड खर्चामुळे उपचारापासून वंचित राहू नये या हेतूने ही मदत देण्यात येत असून हृदय शस्त्रक्रिया, सर्व प्रकारचे कर्करोग, रस्ते अपघातात गंभीर जखमी झाल्यामुळे तातडीची डोक्यावरील शस्त्रक्रिया तसेच पन्नास वर्षाच्या आतील सीव्हीई (सेरेबेलर व्हेसकुलर ॲपीसोड) झालेले रुग्ण यांना मुख्यमंत्री सहायता निधीमधून उपचारासाठी हा निधी थेट संबंधित रुग्णालयांच्या बँक खात्यात जमा केली जाते. या निधीमुळे गरिब रुग्णांनाही तात्काळ व अत्यावश्यक शस्त्रक्रिया करुन रुग्णांना जीवनदान मिळत आहे.