Breaking News

पाटीदार समाजाला काँग्रेससोबत जाऊन आरक्षणाचा लाभ होणार नाही - रामदास आठवले


मुंबई, दि. 23, नोव्हेंबर - गुजरात विधानसभा निवडणुकांत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा भाजपला संपूर्ण पाठिंबा असेल. पाटीदार समाजाचा नेता हार्दिक पटेलच्या पाटीदार समाजाला काँग्रेससोबत जाऊन आरक्षणाचा लाभ होणार नाही. तर भाजपला साथ देऊनच होईल यासाठी आपण तेथे जाऊन त्यांची समजूत घालणार आहोत, अशी माहिती केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आज येथे दिली. गुजरातमध्ये भाजपच किमान 125 जागा जिंकून सत्तेवर येईल, असा विश्‍वासही आठवले यांनी व्यक्त केला.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी 6 डिसेंबर रोजी मुंबईत चैत्यभूमीवर लाखो लोक येतात. त्यांची योग्य व्यवस्था व सोयीसुविधांचा आढावा घेण्याबाबत आज मंत्रालयात बैठक झाली. त्या संदर्भात माहिती देण्यासाठी ते पत्रकार कक्षात आले होते. सोबत राज्याचे सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले उपस्थित होते. चैत्यभूमीला इतर ध र्मियांच्या तीर्थक्षेत्राप्रमाणे मदत व्हावी अशी सातत्याने मागणी आहे. त्याचा पुढच्या वर्षी विचार होऊ शकतो असेही आठवले यांनी यावेळी सांगितले.

आठवले यांनी यावेळी इंदूमिल येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या भव्य स्मारकाससंदर्भात माहिती दिली. स्मारक उभारणीच्या कामाची निविदा निघाली असून 2019 पर्यंत स्मारकाचे काम पूर्ण होईल. उद्घाटनाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाच निमंत्रित करू असेही त्यांनी सांगितले. स्मारक आराखडा हा सर्व संबंधित संघटना व नेते यांच्याशी चर्चा करू नच निश्‍चित झाला असल्याचे बडोले यांनी सांगितले. तेथे काही शैक्षणिक सुविधा करायच्या तर त्याचा विचार स्मारक उभारणी झाल्यावर करता येईल, असेही स्पष्ट केले.