रिफायनरी प्रकल्प जमीनमोजणीला विरोध करणार्या 46 जणांना ताब्यात घेतले
नाणार परिसरातील पाळेकरवाडी, डोंगर दत्तवाडी, सागवे कात्रादेवीवाडीतील रिफायनरी प्रकल्पाची 20 नोव्हेंबर पासून भूमी अभिलेख विभाग व महाराष्ट्र औद्योगिक महामंडळाकडून मोजणी सुरू झाली आहे. पहिल्या दिवशी स्थानिक प्रकल्प विरोधकांनी जोरदार विरोध केल्याने मोजणीला व्यत्यय आला होता.
नाणार वगळता काही ठिकाणी कडेकोट बंदोबस्तात सुरू झालेली जमीन मोजणी स्थानिक प्रकल्प विरोधकांच्या विरोधामुळे दिवसभरात दोन वेळा रोखण्यात आली. प्रकल्पग्रस्तांचे आंदोलन शांततापूर्ण मार्गाने दिवसभर सुरूच होते. यापूर्वी एकदा त्या प्रकल्पातील संपादित जमिनीची मोजणी स्थानिक जनतेच्या विरोधामुळे हाणून पाडण्यात आली होती.
त्यानंतर आता शासनाने नाणारसह पाळेकरवाडी, डोंगर दत्तवाडी, सागवे-कात्रादेवीमध्ये मोजणीचे काम हाती घेतले. काल जमीन मोजणीदरम्यान चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. सकाळी मोजणीला सुरुवात झाली होती. त्यानंतर हळूहळू प्रकल्पविरोधी संघर्ष समितीच्या सदस्य व जनता मोजणीस्थळावर जमा झाले. त्यांनी मोजणीला विरोध दर्शवायला सुरुवात केली.
त्यामुळे नाणार वगळता बाकीच्या ठिकाणी दुपारपर्यंत मोजणी थांबवण्यात आली होती. केवळ नाणार परिसरात प्रकल्प समर्थकांकडून मोजणीला पाठिंबा मिळाल्याने तेथील मोजणी सुरळीत सुरू होती. शिवसेना पक्षप्रमुख उद्धवव ठाकरे यांनी अलीकडेच राजापूरच्या त्यांच्या दौर्यात विनाशकारी प्रकल्पांना विरोध करताना रिफायनरी संदर्भात आपण प्रकल्पग्रस्तांच्या पाठीशी ठामपणे असल्याचे स्पष्ट केले होते.
मात्र सेनेचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या आदेशाखाली नाणार, पाळेकरवाडी, दत्तवाडी, कात्रादेवीवाडी येथील जमीन मोजणीची कार्यवाही करण्यात आली. त्यामुळे शिवसेनेच्या दुटप्पी भूमिकेबाबत प्रकल्पग्रस्तांमध्ये उलटसुलट चर्चा सुरू होती.
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी दैनिक लोकमंथन चे फेसबुक पेज लाईक आणि ट्विटर वर फॉलो करा
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी दैनिक लोकमंथन चे फेसबुक पेज लाईक आणि ट्विटर वर फॉलो करा
