Breaking News

गॅस सिलेंडर दरवाढी विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे तीव्र जनांदोलन

नाशिक, दि. 02, नोव्हेंबर - गेल्या महिनाभरात गॅस सिलेंडरमध्ये साधारणतः सव्वा दोनशे रुपयांची दरवाढ झाली असून त्यापैकी आज (दि.1) जवळपास 95 रुपयांहून अधिकची  दरवाढ झाली. त्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष रंजन ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली व प्रदेश सरचिटणीस नानासाहेब महाले, मनपा गटनेते गजानन शेलार, युवक अध्यक्ष  अंबादास खैरे, शहर सरचिटणीस संजय खैरनार यांच्या उपस्थित जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर तीव्र जनांदोलन करून निवासी जिल्हाधिकारी रामदास खेडकर यांना निवेदन देण्यात  आले. जिल्हाधिकारी यांना गॅस सिलेंडरची भेट देण्यास नेत असताना पोलिसांना प्रतिबंध करत सिलेंडर बाहेर नेण्यात आले.
गेल्या महिन्यापासून गॅस सिलेंडरचे दर दिवसेंदिवस वाढत असून गरीब व मध्यमवर्गीय जनतेला या अवाजवी दराचा चटका बसत आहे. ऑगस्ट महिन्यापासून कंपनीने सिलेंडर  दरवाढीचे धोरण स्वीकारल्याने ऑगस्ट ते नोव्हेंबर या महिन्यात सिलेंडरमध्ये साधारणतः सव्वा दोनशे रुपयांची दरवाढ झाली असून, त्यापैकी आज जवळपास 95 रुपयेहून अधिकची  दरवाढ झाली आहे. या दरवाढीमुळे सर्वसामान्य जनता हैराण झाली आहे.
सरकारने राशन दुकानात मिळणारे रॉकेलही बंद केल्याने गरीब व मध्यमवर्गीय जनतेला गॅस सिलेंडरशिवाय पर्याय उरलेला नाही. काळ्या बाजारात मिळणारे रॉकेल जवळपास 70  रुपये प्रतिलिटर पोहचले दर महिन्यालाच गॅस सिलेंडरची दरवाढ होत असल्याने जनतेला जगणे मुश्कील झाले आहे.
गॅस सिलेंडर सर्वसामान्यांसाठी दैनंदिन गरज असून शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागातही गॅसधारकांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. तसेच पेट्रोल व डिझेलच्या अवाजवी किमतीत  वाढ झाल्यावरही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने निवेदन देण्यात आले होते त्यानंतर यात किरकोळ कपात करण्यात येवून पुन्हा दरवाढ करत जनतेच्या डोळ्यात धूळफेक करण्यात  आली. सदरची दरवाढ लवकरात लवकर रद्द करून गॅस सिलेंडरची किंमत पूर्वरत करावी व होणारी दरवाढ नियंत्रणात आणून सर्वसामान्य जनतेला दिलासा द्यावा, असे निवेदनात  म्हटले आहे.