Breaking News

पिंपळगाव तलाव जमिनीचा ताबा घेण्यास सुरवात, आदिवासी समाजाची आयोगाकडे धाव

नगर ता प्रतिनिधी- तालुक्यातील पिंपळगाव माळवी तलावातील सुमारे ७०० एकर जमिनीवर महानगरपालिकेची नोंद झाल्यानंतर मनपाने प्रत्यक्ष ताबा घेण्याच्या प्रक्रियेला सुरुवात केली आहे. दरम्यान, तलावात वास्तव्यास असणा-या आदिवासी भिल्ल समाजाने तेथील जमिनीवर नावाची नोंद लावण्यासाठी राष्ट्रीय अनुसुचित जनजाती आयोगाकडे निवेदन देऊन मागणी केली आहे.


पिंपळगाव तलावातील ७०० एकर क्षेत्रावर तेथे पिढ्यानपिढ्या वास्तव्यास असणा-या आदिवासी समाजाने आपल्या नावाची नोंद करण्यासाठी शासन दरबारी पाठपुरावा केला. परंतु सदर क्षेत्रावर मनपाच्या नावाची नोंद करण्यात आली. मनपाकडून तेथे पर्यटनस्थळ विकसित करण्यासाठी प्रयत्न सुरु झाले आहेत. 

सोमवारी {दि.२७} जागेचा ताबा घेण्याचे काम मनपाकडून सुरु झालेले आहे. आदिवासी समाजाच्या शिष्टमंडळाने जागेच्या प्रश्नाबाबत मुंबई येथे राष्ट्रीय अनुसुचित जनजाती आयोगाच्या सदस्या श्रीमती माया ईवनाते यांची भेट घेऊन चर्चा केली. आदिवासींच्या समस्या सोडवणार असल्याचे आश्वासन ईवनाते यांनी दिले असल्याची माहिती बाळासाहेब पवार व पोपट ससे यांनी दिली. आयोगाकडुन त्याबाबत प्रशासनाशी पत्रव्यवहार सुरु असून निर्णयाची प्रतिक्षा आहे.

पिंपळगाव तलावाचे क्षेत्र कागदोपत्री ७०० एकर असले तरी आदिवासी समाजाने त्याची मोजणी केली. तेथील क्षेत्र दप्तरी नोंद असलेल्या क्षेत्राच्या तिनपट भरत असल्याचे हि आदिवासी समाजाच्या वतीने सांगण्यात येत आहे. शासनाच्या वतीने मोजणी करुन पालीकेच्या नावावरील क्षेत्रावर पालीकेने ताबा घेऊन इतर ऊर्वरीत क्षेत्रावर आदिवासी भिल्ल समाजाच्या नावाची नोंद करावी, अशीही मागणी आदिवासी समाजाकडुन होत आहे.

आदिवासी समाज हा पिढ्यानपिढ्या तेथे वास्तव्यास असल्याचे इतिहासकालीन पुरावे आहेत. तलाव होण्याच्या पुर्वीपासुन सिना नदिच्या काठावर वास्तव्य करुन मच्छीमारी करत आदिवासी समाज आपली ऊपजिवीका भागवत होता. पालीकेच्या निर्णयामुळे तलावात वास्तव्यास असणारा संपूर्ण आदिवासी समाज ऊघड्यावर येणार आहे. परंतु त्यांच्या भविष्याची चिंता कोणत्याही अधिकारी अथवा पदाधिकार्याला नसल्याने आदिवासी समाजाकडून खंत व्यक्त करण्यात येत आहे.

मनपा राबवत असलेला ‘ड्रिम प्रोजेक्ट’ हा श्रीमंत लोकांसाठी उपयोगी पडणार असून आदिवासी समाजातील गोरगरीबांच्या घरावर नांगर फिरवून आमच्या मुला- बाळांच्या भविष्याचा विचार न करता पालीका काय साध्य करु इच्छित आहे, असा संतापजनक सवाल आदिवासींकडून उपस्थित करण्यात येत आहे. 

दप्तरी नोंद असलेल्या क्षेत्रापेक्षा वाढीव भरत असलेल्या क्षेत्रावर आदिवासींच्या नावावर नोंद करावी, नंतरच मनपाने तेथे प्रोजेक्ट राबवावा, अशी मागणी बाळासाहेब पवार, पोपट ससे, गंगाधर माळी, लक्ष्मण वाघ, संजय गायकवाड, ज्ञानदेव साबळे, बाबासाहेब गांगुर्डे, शांता वाघ, श्रीमती मोरे, गोरख साळुंके, रवी पवार, बाबासाहेब शिंदे, मल्हारी ससे, सुभाष माळी, राजु सुर्यवंशी, बाळु पवार, दिलीप पवार, निलेश बर्डे यांनी केली.