Breaking News

तहसील रस्त्याची अवकळा कधी हटणार? स्थानिक नागरिकांचा सवाल


राहुरी प्रतिनिधी - राहुरी शहरात विविध विकास कामांअंतर्गत रस्त्यांचे मजबुतीकरण व डांबरीकरण होऊन रस्ते चकाचक होत आहेत. शहराच्या प्रभागात विकासकामे होताना रस्त्यांना ‘अच्छे दिन’ आले आहेत. मात्र प्रभाग क्रमांक ३ मधील विविध शासकीय कार्यालय असलेला राहुरी तहसीलचा परिसर व या कार्यालयांकडे जाणारा रस्ता उपेक्षित असल्याचे चित्र आहे. स्टेशनरोडपासून पूर्वेकडे तहसिल कार्यालयाकडे जाणारा अंदाजे हजार फुटांचा रस्ता ओबडधोबड झाला असल्याने या रस्त्याला ‘अच्छे दिन’ येऊनही याची अवकळा दूर होणार का, संबंधित विभाग या रस्त्याची डागडूजी करुन चकाचक करणार का, असा सवाल या रस्त्याने जाणारे येणारे नागरिक करत आहेत.
शहरातील स्टेशनरोडपासून पूर्वेकडे जाणाऱ्या रस्त्यावर भूमि अभिलेख कार्यालय, तहसिल कार्यालय, तालुका पोलिस ठाणे, वनीकरण विभाग, पशुवैद्यकीय दवाखाना, पोलिस कर्मचारी वसाहत आदी कार्यालये व आस्थापनांचा समावेश आहे. या कार्यालयांकडे कामकाजासाठी तालुक्याच्या जनतेचा रोजचा संपर्क असतो. या परिसराकडे जाणारा हजार फुटांचा रस्ता जागोजागी उखडलेला आहे. खड्डे पडले असल्याने रस्त्यावर दगडी खड्यांचा खच पडलेला आहे. या रस्त्याने पायी चालणेही जिकरीचे झाले आहे. 

वाहनचालकांनाही या रस्त्यावर मोठी कसरत करावी लागते. अशा या खराब रस्त्याच्या दुरावस्थेकडे ना सार्वजनिक बांधकाम खात्याचे लक्ष, ना राहुरी नगरपरिषद प्रशासनाचे. त्यामुळे नेमका हा रस्ता कोणाच्या अखत्यारीत आहे, हा प्रश्न अनुत्तरीत आहे. त्यामुळे येथील रस्ता दुरुस्तीच्या प्रतिक्षेत उपेक्षित असल्याचे चित्र आहे. या रस्त्याला ‘अच्छे दिन’ येणार का, हा रस्ता आणखी खराब होऊन हा रस्ता खड्ड्यात हरवला जाणार, असे या रस्त्याकडे पाहिल्यावर लक्षात येते.