Breaking News

शिंदे येथील टोलनाका राष्ट्रवादीने पाडला बंद

नाशिक, दि. 11, नोव्हेंबर - मध्यरात्रीपासून सुरु झालेला नाशिक - पुणे महामार्गावरील शिंदे, ता.नाशिक येथील टोलचे गेट उघडे करून राष्ट्रवादी काँग्रेसने टोल नाका बंद पाडला. नाशिक - पुणे महामार्गावरील सिन्नर ते नाशिक या प्रवासादरम्यानच्या शिंदे, ता.नाशिक येथील टोल नाक्यावर 9 नोव्हेंबरच्या मध्यरात्रीपासून टोल शुल्क आकारणी सुरु करण्यात आली आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसने आंदोलन करून टोलबाबत आंदोलन छेडले.
सिन्नर - नाशिक रस्त्याचे बहुतांशी काम अपूर्ण आहे. टोल आकारणी केंद्र असलेले शिंदे गाव, बंगाली बाबा मंदिराजवळील पुलाचे काम तसेच चेहडीपासून पुढे नाशिक पर्यंतचे काम अपूर्ण असल्याने टोलवर शुल्क आकारणी कशी सुरु केली, असा सवाल करत राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड.रविंद्र पगार यांच्या नेतृत्वाने जोरदार आंदोलन करण्यात आले. यावेळी टोल नाका बंद पाडत टोल नाक्यावर रांगेत उभ्या असलेल्या वाहनांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी गेट उघडे करून दिले.
टोल आकारणी सुरु केली असली तरी अद्यापही रस्त्याचे काम पूर्ण झालेल्यामुळे सर्वसामान्य जनतेला मोठ्या प्रमाणावर त्रासाला सामोरे जावे लागत आहे. अपघातांचे प्रमाण देखील वाढले आहे. अशी परिस्थिती असतांना देखील टोल शुल्क वसुली करण्याची घाई करण्याचे कुठलेही कारण नाही. या रस्त्याचे काम पूर्ण होईपर्यंत टोल नाक्यावर शुल्क आकारणी सुरु करू नये या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचा मोर्चा थेट टोल नाक्यावर नेण्यात आला होता. यावेळी टोल नाक्यावरच नाशिक - सिन्नर टोलवेज कंपनीचे प्रकल्प संचालक सुनील भोसले यांना कार्यकर्त्यांनी घेराव टाकत जोरदार घोषणाबाजी केल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. यावेळी पोलिसांनी मध्यस्थी करून आंदोलनकर्ते व टोलवेज कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक उद्धव रुपचंदाणी यांची चर्चा घडवून आणली.
टोल नाक्यावर नोकर्‍यांमध्ये स्थानिक युवकांनाच प्राधान्य देण्यात येणार असल्याचेही राष्ट्रवादी काँग्रेसच्या मागणीनंतर रूपचंदानी यांनी जाहीर केले .स्थानिक वाहनांना टोलमधून मुक्ती द्यावी व रस्त्याचे काम पूर्ण झाल्याशिवाय टोल घेऊ नये, या मागण्यांचे राष्ट्रवादी काँग्रेसचे निवेदन वरिष्ठांकडे पाठवून त्याबाबतचा निर्णय मागविला जाईल असेही रूपचंदानी यांनी सांगितले.