Breaking News

जलयुक्त शिवार योजनेमुळे भूजल पातळीत वाढ - सदाभाऊ खोत

सांगली, दि. 11, नोव्हेंबर - जलयुक्त शिवार योजनेमुळे मागील पाच वर्षांतील ऑक्टोबर अखेरच्या सरासरी भूजल पातळीच्या तुलनेत यावर्षी जिल्ह्यातील सहा तालुक्यांमध्ये भूजल पातळी वाढली आहे. यामध्ये मिरज, शिराळ्याबरोबर दुष्काळी आटपाडी तालुका, पलूस, कडेगाव, वाळवा यांचा प्रामुख्याने उल्लेख करावा लागेल. ही बाब समाधानकारक आहे. त्यामुळे सर्वांसाठी पाणी - टंचाईमुक्त महाराष्ट्र 2018 जलयुक्त शिवार योजनेचे चांगले परिणाम आता दिसू लागले आहेत. त्यातून दुष्काळी भागाला दिलासा मिळणार आहे, असे प्रतिपादन कृषि राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी  येथे दिले. 
जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठक सभागृहात आयोजित जिल्ह्यातील जलयुक्त शिवार योजना आढावा बैठकीत ते बोलत होते. खोत म्हणाले, जलयुक्त शिवार योजनेमुळे मिरज तालुक्यात मागील पाच वर्षांतील ऑक्टोबर अखेरच्या सरासरी भूजल पातळीच्या 3.53 मीटरच्या तुलनेत यंदाची भूजलपातळी 2.75 मीटर आहे. शिराळा तालुक्यात 1.63 मीटरवरून 1.32 मीटर अशी भूजलपातळी वर आली आहे. आटपाडी तालुक्यात 5.50 मीटरवरून 4.75 मीटर अशी भूजलपातळी वर आली आहे. पलूस तालुक्यात 4.17 मीटरवरून 3.50 मीटर अशी भूजलपातळी वर आली आहे. तर कडेगाव तालुक्यात 4.83 मीटरवरून 4.20 मीटर अशी भूजलपातळी वर आली आहे. वाळवा तालुक्यात 1.99 मीटरवरून 1.97 मीटर अशी भूजलपातळी वर आली आहे. त्यामुळे सर्वांसाठी पाणी टंचाईमुक्त महाराष्ट्र 2018 जलयुक्त शिवार योजनेचे परिणाम आता दिसू लागले आहेत. यामुळे दुष्काळी भागाला दिलासा मिळणार आहे, असे ते म्हणाले
जलयुक्त शिवार योजनेंतर्गत जिल्ह्यात होणार्‍या कामांच्या दर्जाबाबत कोणताही तडजोड केली जाणार नाही. ही कामे दर्जेदार झाली पाहिजेत. त्याची आपण प्रत्यक्ष पाहणी करणार असल्याचे सांगून राज्यमंत्री सदाभाऊ खोत म्हणाले, या योजनेंतर्गत सांगली जिल्ह्यात हाती घेण्यात आलेली कामे दर्जेदार करा. या कामांबाबत कोणताही तक्रार येता कामा नये. तसेच, पुढील वर्षासाठीचा आराखडा लोकप्रतिनिधी व शासकीय यंत्रणा यांनी समन्वयाने तयार करावा. टँकरग्रस्त गावे टँकरमुक्त करण्यासाठी जलयुक्त शिवार योजनेच्या माध्यमातून कामे हाती घ्या. या माध्यमातून टंचाईग्रस्त गावांमध्ये पाण्याचे स्त्रोत बळकट होणे आवश्यक आहे. या योजनेशी संबंधित वन विभाग, लघुसिंचन, छोटे पाटबंधारे विभाग यासह सर्व विभागांनी समन्वयाने आणि दर्जेदार कामे करावीत, अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या.
खोत म्हणाले, जिल्ह्यात सन 2016-17 च्या आराखड्यानुसार 31 ऑक्टोबरअखेर जिल्ह्यात चार हजार, 573 कामे पूर्ण झाली आहेत. तर 355 कामे प्रगतीपथावर आहेत. ही बाब समाधानकारक आहे. मात्र, प्रगतीपथावरील कामे डिसेंबरअखेर पूर्ण करण्याचे आदेश त्यांनी यावेळी दिले.