Breaking News

लोणंद नगरपंचायतीची प्लॅस्टिक पिशव्या वापरणा-या व्यापा-यांवर कारवाई

सातारा, दि. 07, नोव्हेंबर - पर्यावरणाचा -हास होऊ नये याकरिता मायक्रोपेक्षा कमी जाडीच्या प्लॅस्टिक पिशव्या विक्रीवर बंदी आहे. तरीही ग्राहकांना नाराज करायला नको म्हणून  लपूनछपून प्लॅस्टिक पिशव्यांचा सर्रास वापर होत आहे. ही बाब लक्षात आल्यानंतर खंंडाळा तालुक्यातील लोणंद नगरपंचायतीने दंडाचे शस्त्र उपसले. या पथकाने शहरातील पंधरा  व्यापा-यांवर कारवाई करून त्यांच्याकडून साडेसात हजारांचा दंड वसूल केला.
लोणंद नगरपंचायतीने सर्वसाधारण सभेतील ठरावाद्वारे लोणंद शहरात प्लॅस्टिक पिशव्या वापरावर बंदीबाबत ठराव केलेला होता. तसेच व्यापा-यांची बैठक घेऊन त्यासंदर्भात सूचना  देण्यात आल्या होत्या. त्या अनुषंगाने शहरातील किरकोळ व्यापारी व घाऊक व्यापारी यांच्याकडे लोणंद नगरपंचायतीच्या वतीने शहरातून प्लॅस्टिक बंदीबाबत धडक कारवाई क रण्यात आली.
या कारवाईत 15 व्यापा-यांवर दंडात्मक कारवाई करून त्यांच्याकडून साडेसात हजारांचा दंड वसूल केला. तसेच 50 मायक्रोपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्या जप्त करण्यात  आल्या. या धडक मोहिमेमध्ये मुख्याधिकारी अभिषेक परदेशी, कार्यालयीन अधीक्षक शंकर शेळके, बाळकृष्ण भिसे, रामदास तुपे, पापा पानसरे, गोरख माने, हणमंत माने यांच्यासह  आरोग्य कर्मचा-यांनी सहभाग घेतला.