Breaking News

बाजार समितीने शेतकर्‍यांना शेतकरी निवास, नाममात्र दरात भोजन व्यवस्था करावी : श्‍वेता महाले

बुलडाणा, दि. 06, नोव्हेंबर - कष्टकरी शेतकर्‍यांच्या शेतमालाला हक्काची बाजारपेठ असलेली कृषी उत्पन्न बाजार समिती ही शेतकर्‍यांच्या हितासाठी स्थापन झालेली संस्था आहे. शेतकर्‍यांमधून निवडलेल्या संचालकांमार्फत या संस्थेचा कारभार शेतकर्‍यांच्या उन्नतीसाठी चालणे अपेक्षीत आहे. परंतु, चिखली कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मात्र शेतकर्‍यांच्या हिताकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्या तथा जिल्हा परिषद सभापती श्‍वेताताई महाले यांनी केला आहे. शेतकर्‍यांकडून वसुल केल्या जाणार्‍या सेसच्या मोबदल्यात चिखली बाजार समितीने अद्ययावत शेतकरी निवास, नाममात्र दरात भोजन, शुध्द पेयजल आदी मुलभूत सुविधा त्वरीत उपलब्ध करून द्याव्या व कार्यालयाचे संगणकीकरण करावे अशी मागणी श्‍वेताताई महाले यांनी एका प्रसिध्दी पत्रकाद्वारे केली आहे.
कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये तालुक्यातील हजारो शेतकरी बांधव आपला शेतमाल विक्रीसाठी आणत असतात. येथे येणारे शेतकरी बांधव अनेकदा उपाशी तापाशी व थकलेले असतात. त्यांना भोजन आणि विश्रांतीची गरज असते. येथे येणार्‍या शेतकर्‍यांना आवश्यक असलेल्या मुलभूत सुविधा पुरवणे बाजार समितीचे कर्तव्य आहे या कर्तव्याची जाणीव बाजार समितीचे संचालक मंडळ व प्रशसनाने ठेवावी अशी अपेक्षा श्‍वेताताई महाले यांनी व्यक्त केली आहे. बाजार समितीच्या मार्केट यार्डमध्ये चालणार्‍या शेतमाल खरेदीवर बाजार समिती प्रशासनाकडून मार्केट सेस आकारला जातो. पूर्वी हा सेस शेतकर्‍यांकडून देखील वसुल केला जात असे. भाजपा सरकारने मात्र यातून शेतकर्‍यांना वगळून दिलासा दिल्याची आठवण श्‍वेताताई महाले यांनी दिली आहे. आता हा कर केवळ व्यापार्यांकडून आकारला जातो. मागील वर्षापयर्ंत हा सेस शेकडा 1 रुपया 5 पैसे आकारला जात असे. परंतु, व्यापार्‍यांच्या सांगण्यावरुन या वर्षीपासून तो प्रती शेकडा 80 पैसे या दराने आकारला जातो. या माध्यमातून बाजार समितीला वार्षिक सुमारे 5 ते 7 कोटी रुपयांचे उत्पन्न मिळते. परंतु, बाजार समितीचे काही संचालक, व्यापारी आणि प्रशासनाच्या संगनमतातून या मार्केट सेसची वसुली मुळातच कमी दाखवून भ्रष्टाचार केला जात असल्याचा आरोप श्‍वेताताई महाले यांनी केला आहे. शेतकर्‍यांच्या  हिताकडे साफ दुर्लक्ष करून येथे स्वत: ची तुंबडी भरण्याचा उद्योग सुरु असल्यचे त्यांनी या प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे. तसेच आपला शेतमाल विकण्यासाठी घेऊन येणार्‍या शेतकर्‍याच्या आवश्यकता लक्षात घेऊन सर्व सोयींनी युक्त असा शेतकरी निवास असणे गरजेचे आहे. मार्केट यार्ड परिसरात येणार्‍या शेतकर्‍याला  विश्रांतीसाठी व वेळ पडल्यास मुक्कामासाठी या शेतकरी निवासाचा उपयोग होऊ शकतो. स्वच्छता गृह, शौचालय व आवश्यक त्या सोयी - सुविधा सदर शेतकरी निवासात असल्यास येणार्‍या शेतकर्‍यास गैरसोय सहन करावी लागणार नाही असे मत श्‍वेताताई महाले यांनी व्यक्त केले आहे. या शिवाय शेतकर्‍याच्या भोजनाची व्यवस्था देखील आवश्यक आहे.
मार्केट यार्डच्या आवारात बाजार समितीने अत्यल्प दरात ही व्यवस्था उपलब्ध करून दिल्यास शेतकर्‍याचा वेळ आणि पैसा दोन्ही वाचेल. याचा विचार करून 5 रुपये नाममात्र दरात भोजन आणि शुध्द पेयजल बाजार समितीद्वारे पुरवल्या जाणे गरजेचे आहे. उत्पन्नाचा मोठा स्त्रोत असलेल्या मार्केट सेसमधून बाजार समिती या सुविधा सहजपणे पुरवू शकते असा दावा श्‍वेताताई महाले यांनी केला आहे.
चिखली कृषी उत्पन्न बाजार समिती कडून या सुविधा पुरवल्या जात नसल्याबद्दल श्‍वेताताई महाले पाटील यांनी खेद व्यक्त केला आहे. कृषी उत्पन्न बाजार समिती म्हणजे केवळ राजकारण आणि भ्रष्टाचाराचा अड्डा बणल्यामुळे शेतकर्‍यांच्या हिताकडे साफ दुर्लक्ष होत असल्याचा आरोप श्‍वेताताई महाले यांनी केला आहे. मार्केट सेसमधील हा गैरव्यवहार थांबवण्यासाठी येथील कार्यालयाचे संपूर्ण संगणकीकरण करावे, जेणे करुन येथील कारभार पारदर्शक होईल व मार्केट सेसच्या उत्पन्नात देखील घसघशीत वाढ होईल अशी महत्वाची सूचना देखील त्यांनी केली आहे. एकीकडे शेतकर्‍यांबद्दलचा खोटा कळवळा दाखवायचा आणि दुसरीकडे शेतकर्‍यांचेच शोषण करायचे असा दुटप्पी कारभार चिखली कृषी उत्पन्न बाजार समितीत चालला असल्यामुळे शेतकर्‍यांना मोठया गैरसोयींना तोंड द्यावे लागते, असेही त्यांनी प्रसिध्दी पत्रकात नमुद केले आहे.