Breaking News

त्रिपुरारी पोर्णिमेनिमित्त श्री क्षेत्र महाबळेश्‍वर मंदिरामध्ये दीपोत्सव उत्साहात

महाबळेश्‍वर, दि. 6 (प्रतिनिधी) : श्री क्षेत्र महाबळेश्‍वर येथील पंचगंगाव व महाबळेश्‍वर मंदिरामध्ये दीपोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. या तीर्थक्षेत्री केलेल्या दीपोत्सवातील दिव्यांच्या प्रकाशाने मनामनात चैतन्य निर्माण झाले.
महाबळेश्‍वर येथील श्री क्षेत्र महाबळेश्‍वर येथे त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त श्री क्षेत्र महाबळेश्‍वर देवस्थान ट्रस्टच्या साहाय्याने व पुणे येथील अलका व सतीश हेरेकर यांच्यावतीने महाबळेश्‍वर मंदिरामध्ये कार्यक्रमांचे आयोजन केले होते कार्यक्रमाची सुरुवात लघुरुद्राने करण्यात आली याचे पौराहित्य येथील प्रसिध्द बाळकाका महाबळेश्‍वरकर व प्रमोद महाबळेश्‍वर यांनी केले. मंदिरामधील स्वयंभू शिवलिंगाला बेलाच्या पानांनी व फुलांची आकर्षक सजावट डोळ्यांचे पारणे फेडत होती महाआरतीचा कार्यक्रम पार पडला. हजारो दिव्यांच्या तेजोमय प्रकाशाने मंदिर परिसर उजळून निघाला होता. पंचगंगा मंदिरात सुध्दा अशा प्रकारे दीपप्रज्वलीत करण्यात आले होते. यावेळी तहसीलदार रमेश शेंडगे यांची उपस्थिती होती. हा दीपोत्सव पाहण्यासाठी महाबळेश्‍वर व परिसरातील भाविकांसह पर्यटकांनी गर्दी केली होती. महाप्रसादाने या कार्यक्रमाची सांगता झाली. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी श्रीक्षेत्र महाबळेश्‍वर ग्रामस्थ व देवस्थान ट्रस्टचे देवेंद्र जगताप यांनी परिश्रम घेतले.