Breaking News

सहकारातूनच समृद्धीचा मार्ग शोधला पाहिजे : शेखर चरेगांवकर

बुलडाणा, दि. 3, नोव्हेंबर -  राज्यातील सहकार हा एक आदर्श आहे. देशात राज्यामध्येच सहकराचा पाया मजबूत आहे. सहकार चळवळीच्या माध्यमातून समाजामध्ये मोठ्या  प्रमाणावर स्थित्यंतरे आलेली आहे. या सहकारातूनच समृद्धीचा मार्ग मिळतो आणि तो शोधला पाहिजे, असे आवाहन महाराष्ट्र राज्य सहकारी परिषदेचे अध्यक्ष शेखर चरेगांवकर यांनी  केले.
स्थानिक सहकार विद्या मंदीर येथील सभागृहात जिल्हा उपनिबंधक कार्यालय, जिल्हा नागरी व पगारदार सेवकांच्या सहकारी पतसंस्थांचा सहकारी संघ व सहकार भारती यांचे संयुक्त  विद्यमाने पं. दिनदयाल उपाध्याय जन्मशताब्दीनिमित्त  सहकार परिषदेचे आयोजन 31 ऑक्टोंबर 2017 रोजी करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर  खासदार प्रतापराव जाधव, व्याख्याते डॉ. नितीन खर्चे, जिल्हा बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अशोक खरात, जिल्हा उपनिबंधक नानासाहेब चव्हाण, जिल्हा नागरी व पगारदार  सेवकांच्या सहकारी पतसंस्थांचा सहकारी संघाचे अध्यक्ष राधेश्याम चांडक, राज्य सहकारी पतसंस्था संघाचे अध्यक्ष काकासाहेब कोयटे, उपाध्यक्ष सुदर्शन भालेराव, सहकार भारतीचे  अध्यक्ष आशीष चौबीसा, बुलडाणा बाजार समिती सभापती जालींधर बुधवत, गणेश वायकोस, राजेंद्र चोथवे आदी उपस्थित होते.
यावेळी खासदार प्रतापराव जाधव म्हणाले, ग्रामसेवा सहकारी सोसायट्या सहकाराचा कणा आहे. या सोसायट्या मजबूत करणे काळाची गरज आहे. त्यामुळे सहकार विभागाने  सोसायट्यांचे मजबूतीकरण करावे. तसेच खाजगी बाजार समित्यांमध्ये शेतकर्‍याला संरक्षण द्यावे.
यावेळी अशोक खरात, नितीन खर्चे उपस्थितांना मार्गदर्शन केले.  प्रास्ताविक जिल्हा उपनिबंधक नानासाहेब चव्हाण यांनी केले. संचलन चिंचोले यांनी केले. कार्यक्रमाला पतसंस्थाचे  संचालक, अध्यक्ष, अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.