Breaking News

विकासकामे करून लोणार शहराचा चेहरा बदलणार-आ.डॉ. रायमूलकर

बुलडाणा, दि. 01, नोव्हेंबर - तालुक्यातील विविध ठिकाणी विकास कामे सुरू असून काही ठिकाणी निविदा प्रक्रिया उघडून येणार्‍या काळात लोणार तालुक्याची विकासकामे करून चेहरा मोहरा बदलणार असल्याचे प्रतिपादन मेहकर-लोणार मतदारसंघाचे आ. डॉ. संजय रायमुलकर यांनी स्थानिक कृ.उ.बा.स.मध्ये आयोजित पत्रपरिषदेमध्ये केले. 
यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख प्रा. बळीराम मापारी, कृउबास समिती सभापती शिव पाटील तेजनकर, संचालक संतोष मापारी, विठ्ठल घायाळ, प्रकाश महाराज मुंढे, अनिल मापारी, शहर प्रमुख पांडूरंग सरकटे आदी मान्यवर उपस्थित होते. पुढे माहिती देताना आ. रायमुलकर म्हणाले की, 93 कोटी रुपयांच्या विकास आराखड्यामध्ये प्रामुख्याने दुर्गा टेकडी परिसरातील जागेचे पर्यटक सुविधा केंद्र, तारांगण, संरक्षक भिंत, परिसरातील मुख्य रस्त्याला जोणारे रस्ते, संग्रालयासाठी 14 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध केला आहे. पर्यटन विभागामार्फत लोणार शहरातील चौकाचे सुशोभिकरण व सौंदर्यीकरण करत रस्त्याच्यामध्ये दुभाजक बसविण्यात येणार आहे. पर्यावरण खात्याअंतर्गत शहरातील लेंडी तलावाचे सुशोभिकरण व सौंदर्यीकरणासाठी 2 कोटी 90 लाख रुपयांचा निधी पर्यावरणमंत्री रामदास कदम यांच्याकडून खेचून आणला. तसेच तिर्थक्षेत्र व पालखी मार्गाकरीता किनगाव जट्टु ते लोणी (सखाराम महाराज) रस्त्याकरीता 40 कि.मी.साठी 95 कोटीरुपयांचा निधी मंजूर करत लवकरच कामास सुरुवात होत आहे. तरी लोणार तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी अहोरात्र झटत असून येणार्‍या काही दिवसात लोणार बसस्थानाकासाठी मंजूर झालेल्या 1 कोटी रुपयाचे कामे त्वरित सुरू होणार आहे. डिजिटल प्लेटफॉर्म सहित बसस्थानकाचे चालक-वाहक विश्रांती कक्ष, शौचालय, बाथरुम सह अद्यावत बसस्थानक करण्याचा मानस आ.डॉ.संजय रायमुलकर यांनी व्यक्त केला आहे.