Breaking News

3400 रुपये पहिली उचल जाहीर करा, मगच गाळप सुरु करा

सातारा, दि. 01 (प्रतिनिधी) : उसाला यावर्षीची पहिली उचल 3400 रुपये जाहीर करा, मगच गाळप सुरु करा, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दिला आहे. तरीही सातारा जिल्ह्यातील चार कारखान्यांनी कोणताही दर जाहीर न करता गाळप सुरु केले. त्यामुळे ’स्वाभिमानी’च्या कार्यकर्त्यांनी आंदोलनाची पहिली ठिणगी पाडली. आगामी आठवड्यात उर्वरित कारखान्यांची मोळी पडेल. जो कारखाना जादा दर देईल, त्यालाच ऊस घालण्याची मानसिकता शेतकर्‍यांची असल्याने यावर्षी जिल्ह्यातच ऊसाची पळावापळवी होणार आहे.
सातारा जिल्ह्यात सहकारी व खाजगी असे मिळून एकूण 15 साखर कारखाने यावर्षी गाळप करणार आहेत. त्यापैकी आतपर्यंत श्रीराम, न्यू फलटण शुगर, सह्याद्री, आणि जयवंत शुगर या चार साखर कारखान्यांनी गाळप सुरु केले आहे. उर्वरित कृष्णा, किसन वीर, खंडाळा, प्रतापगड, अजिंक्यतारा, रयत, बाळासाहेब देसाई, जरंडेश्‍वर, ग्रीन पॉवन शुगर, स्वराज्य इंडिया अ‍ॅग्रो, शरयू यांचे गाळप आगामी आठवड्यात सुरु होईल. जिल्ह्यात यावर्षी 56 हजार हेक्टरवर गाळपासाठीचा ऊस उपलब्ध आहे. कारखान्यांत दराची स्पर्धा झाल्यास उसाची पळवापळवी होण्याची शक्यता आहे. जादा दर देणार्‍या कारखान्यांना ऊस घालण्याची मानसिकता शेतकर्‍यांची आहे. सध्या तरी चार कारखान्यांनी गाळप सुरु केले आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेने ऊस परिषद घेऊन यावर्षीचा ऊस दर जाहीर केला. पहिली उचल 3400 रुपये जाहीर करुन मगच कारखाने सुरु करा, असे आवाहन स्वाभिमानी नेते व खासदार राजू शेठ्ठी यांनी केले. मात्र, सातारा जिल्ह्यातील एकाही कारखान्याने अद्यापही संघटनेची मागणी मान्य केलेली नाही. अशात काल कराड तालुक्यातील पार्ले परिसरात कारखान्यांनी ऊस तोड सुरु केल्याने त्याविरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. ऊस दराच्या आंदोलनाची पहिली ठिणगी कराड तालुक्यातून पडली असल्याची यावेळी दिसले.