Breaking News

डॉ. आंबेडकर स्मारकाच्या पहिल्या टप्प्यातील बांधकामाचा उद्घाटन सोहळा संपन्न

नवी मुंबई, दि. 02, नोव्हेंबर - उपेक्षित समाजामध्ये आत्मविश्‍वास निर्माण करणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे लोकोत्तर नेतृत्व होते. त्यांचे शोषीत समाजाला न्याय देण्याचे काम मोठे  आहेच शिवाय त्यासोबच अर्थशास्त्र, पाटबंधारे, विद्युत निर्माती, कामगारहित, सामाजिक समता अशा विविध क्षेत्रामधले कार्य अत्यंत मोठे असून नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने  उभारण्यात येणा-या बाबासाहेबांच्या स्मारकाच्या माध्यमातून हे सर्व समावेशक बाबासाहेब नव्या पिढीसमोर पोहचले पाहिजेत, विशेषत्वाने बाबासाहेबांचा आर्थिक दृष्टीकोन याठिक ाणच्या ग्रंथालय व चित्रफितीव्दारे समाजापर्यंत पोहचला पाहिजे, अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. शरद पवार यांनी आपले विचार मांडले.
नवी मुंबई महापालिकेच्या वतीने सेक्टर 15 ऐरोली येथे उभारण्यात येत असलेल्या भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्या पहिल्या टप्प्यातील बांधकामाचा उद्घाटन समारंभ  आणि दुस-या टप्प्यातील बांधकामाचा शुभारंभ प्रसंगी उद्घाटक म्हणून ते आपले मनोगत व्यक्त करीत होते. त्यांनी आपल्या भाषणात बाबासाहेबांच्या जीवन चरित्राचा विस्तृत आढावा  घेत नव्या भारताच्या उभारणीचा विचार करणारे अर्थशास्त्रज्ञ म्हणून बाबासाहेबांचे महत्वपूर्ण योगदान, स्वातंत्र्यपूर्व काळात कर पध्दती कशी असावी याबाबत त्यांनी काढलेला जन हिताय आदेश, कामगार हिताचे जे जे कायदे झाले त्यावर असलेला बाबासाहेबांच्या विचाराचा प्रभाव पाठबंधारे, विद्युत निर्मिती, दळणवळणाची साधने याविषयी त्यांनी केलेले दूरगामी  विचार व त्याला दिलेले प्राधान्य अशा अनेक बाबींवर खा.शरदचंद्र पवार यांनी विविध दाखले देत विवेचन केले. अशा लोकोत्तर नेतृत्वाचे विचारधन आपल्या मुख्यमंत्री पदाच्या क ाळात 1978 साली 18 खंडात प्रसिध्द करता आले तसेच बाबासाहेबांच्या जीवन चरित्रावर आधारित चित्रपट निर्मितीत योगदान देता आले याचा त्यांनी अभिमानाने उल्लेख केला.
नवी मुंबई हे देशातील एक महत्वाचे शहर असून मोरबे धऱणासारखा महत्वपूर्ण निर्णय, 200 हून अधिक शहराचे पर्यावरण राखणारी उद्याने तसेच 70 हून अधिक मैदाने इतर  शहरांपेक्षा नवी मुंबईचे वेगळेपण दाखवतात असे सांगत खा. पवार यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे हे स्मारकही शहराच्या नावलौकीकात मोठी भर घालणारे असल्याचे  गौरवोद्गार काढले.
महापौर सुधाकर सोनवणे यांनी आपल्या मनोगतात बाबासाहेब हा समतेचा विचार आहे असे सांगत या या भव्यतम स्मारकाच्या उभारणीतून नवी मुंबईची एक नवी प्रतिमा जगभरात  निर्माण होईल असा विश्‍वास व्यक्त केला.