Breaking News

मतदारयादी पुनरिक्षण : दावे व हरकती स्विकारण्यासाठी 30 नोव्हेंबरपर्यंतची मुदतवाढ

सांगली, दि. 02, नोव्हेंबर - भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार दिनांक 1 जानेवारी 2018 या अर्हता दिनांकावर आधारित मतदार छायाचित्र याद्यांचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण  कार्यक्रम दिनांक 3 ऑक्टोबर 2017 ते 3 नोव्हेंबर 2017 या कालावधीसाठी सध्या सुरू आहे. परंतु, या कार्यक्रमांतर्गत दावे आणि हरकती स्विकारण्याची मुदत दिनांक 30 नोव्हेंबर  2017 पर्यंत वाढविण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी वि. ना. काळम यांनी दिली.
जिल्ह्यात 2 हजार 402 मतदार यादी भाग असून प्रत्येक भागाकरिता 2 हजार 402 मतदार केंद्रस्तरीय अधिकार्‍यांची नियुक्ती करण्यात आली आहे. एनव्हीएसपीव्दारे ऑनलाईन  अर्ज स्विकारण्याची सुविधा आहे. मतदार यादीत समावेश करण्यासाठी नमुना 6, नाव वगळण्यासाठी नमुना 7, तपशिलात बदल करण्यासाठी नमुना 8, विधानसभा मतदार संघांतर्गत  पत्ता बदल करण्यासाठी 8-अ असे अर्ज उपलब्ध आहेत. एकापेक्षा अधिक ठिकाणी किंवा अधिक वेळा मतदार यादीत नाव असल्यास ते वगळण्यासाठी नागरिकांनी अर्ज करावेत.  मृत झालेल्या मतदारांचे नाव वगळण्यासाठी त्यांच्या कुटुंबियांनी अर्ज करावेत. दिनांक 15 ते 30 नोव्हेंबर 2017 या कालावधीत चुकाविरहित मतदार यादी तयार करण्यासाठी  बीएलओ यांच्यामार्फत माहिती संकलित करण्यात येणार असून बीएलओ यांना अचूक व आवश्यक ती माहिती पुरविण्यात यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक  अधिकारी वि. ना. काळम यांनी केले आहे.