Breaking News

सामाजिक सदभाव जोपासल्याशिवाय देशाची उन्नती अशक्य - मोहन भागवत

जालना, दि. 08, नोव्हेंबर - दोष दूर केल्याशिवाय कोणाचीही उन्नती होत नसते. आपण सामाजिक सदभाव जोपासल्याशिवाय आपल्या देशाची उन्नती होणार नाही असे प्रतिपादन  रा. स्व. संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी केले. जालना येथे आयोजित समरसता संगम या कार्यक्रमात मार्गदर्शन करताना ते बोलत होते यावेळी सरला बेटाचे महंत रामगिरी  महाराज हे अध्यक्षस्थानी होते. व्यासपीठावर संघाचे देवगिरी प्रान्त संघचालक अ‍ॅड. दादा पवार, जिल्हा संघचालक सुनील गोयल उपस्थित होते. 
यावेळी सरसंघचालक म्हणाले की, जगात जीवन उभे करताना अर्थ, काम आणि मोक्ष यांचाच विचार केला गेला. मात्र भारतीय संस्कृतीने त्याला धर्म जोडून परिपूर्ण बनविले.  समाजाला संघटित करताना त्याला चारित्र्याचा आधार आवश्यक ठरतो. भारतीय समाजात खाणे, पिणे, वेष, उपासना अशा अनेक बाबतीत विविधता दिसून येते मात्र या वि विधतेमध्येही एक समानतेचा आणि एकतेचा धागा आहे. व्यक्ती, समष्टी आणि परमेष्टी यांचा समन्वय लक्षात घेतला पाहिजे. आपण मतभेदाना मूठमाती देवून सद्भाव जागा करताना  आपली ओळख आपल्याला झाली पाहिजे. आपण हिंदू आहोत याचे भान आपल्याला असले पाहिजे असे त्यांनी सांगितले. समाजात समरसता निर्माण करण्यासाटी जालना येथे दोन  दिवसांची बैठक आयोजित करण्यात आली आहे. त्या निमित्ताने समरसता संगम या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला सुमारे 15 हजार नागरिक उपस्थित  होते.