Breaking News

राळेगणसिद्धी येथे ’विनामूल्य’ आरोग्य शिबिराचे आयोजन

अहमदनगर, दि. 06, नोव्हेंबर - ज्येष्ठ समाज सेवक अण्णा हजारे यांच्या मातोश्री लक्ष्मीबाई हजारे यांच्या स्मृतिदिनाचे औचित्य साधून नगर जिल्ह्यातील गरीब व गरजू रुग्णांना मोफत वैद्यकीय सेवा व उपचार उपलब्ध करून देण्यासाठी भव्य स्वरूपात आरोग्यशिबिराचे आयोजन करण्यात येणार आहे. येत्या 19 नोव्हेंबर रोजी या शिबिराचे आयोजन करण्यात येणार आहे. याबाबतची प्राथमिक नियोजनासंदर्भात एक बैठक राळेगणसिद्धी येथे नुकतीच संपन्न झाली. या बैठकीस ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे, जिल्हाधिकारी अभय महाजन,मुख्यकार्यकारी अधिकारी विश्‍वजित माने, सहजिल्हा शल्यचिकित्सक   डॉ.चाबुसकर,जिल्हा आरोग्य अधिकारी बी.एच.पालवे उपसरपंच  औटी आदी उपस्थित होते.
बैठकीदरम्यान शिबिराच्या नियोजनासंदर्भात चर्चा करण्यात आली.यावेळी हजारे यांनी गरजू रुग्णांसाठी हे शिबीर अत्यंत महत्वाचे असून या द्वारे मोठ्या प्रमाणात गरजूंना रुग्ण सेवा उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासनाने सूक्ष्म नियोजन करावे अशा सूचना मांडल्या.
या शिबिराचे नियोजन वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीष महाजन, यांच्या पुढाकारातून वैद्यकीय शिक्षण विभाग, आरोग्य विभाग व जिल्हा प्रशासन तसेच राळेगणसिद्धी ग्रामस्थांच्या समन्वयातून केले जाणार आहे. यावेळी जिल्हाभरातील गरीब गरजू रुग्णांना विविध आजारांवर विविध ठिकाणच्या तज्ञ डॉक्टरांमार्फत वैद्यकीय उपचार दिले जाणार आहेत.