Breaking News

कारागृह म्हणजे आत्मचिंतनाचे कार्यगृह - ह.भ.प. शर्मा

अहमदनगर, दि. 06, नोव्हेंबर - अयोग्य वातावरणात राहिल्याने आपल्या हातून चुक होते; त्याचे प्रायश्‍चित घेण्यासाठी कारावास भोगावा लागतो. कारागृह हे आपण केलेल्या कृत्याचे प्रायश्‍चित घेण्यासाठी असल्याने बंदी बांधवाने दररोज काहीवेळ आत्मचिंतन करण्याचे कार्यगृह आहे असे मानावे. अपराधीपणाची भावना मनातून काढून टाका. कारागृहातून बाहेर पडल्यानंतर आपल्यातील कर्तुत्वाने उज्वल जीवन जगण्याचा निश्‍चय करा. तुमच्या सुखातच कुटूंबाचे सुख असते; हे लक्षात ठेवा, असे प्रतिपादन हभप समाधान महाराज शर्मा यांनी अ.नगर जिल्हा कारागृहातील बंदी जणांच्या मानसिक स्वास्थ्यासाठी आयोजित प्रवचनात केले.
जिल्हा कारागृहात आयोजित प्रवचनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी  निवासी उपजिल्हाधिकारी गोपीचंद कदम, जिल्हा विधीसेवा प्राधिकरणचे न्यायाधिश पद्माकर केस्तीकर, सारेगमप लिटील चॅम्प स्पर्धेची विजेती अंजली गायकवाड, नंदीनी गायकवाड ,प्रसिद्ध गायक पवन नाईक, नेत्रतज्ञ डॉ.सुधा कांकरिया, मनपा विरोधीपक्ष नेते बाळासाहेब बोराटे, सभागृहनेते गणेश कवडे, तुरंग अधिक्षक नागनाथ सावंत, वरिष्ठ तुरुंगाधिकारी श्यामकांत शेडगे, तुरुंगअधिकारी देविका बेडवाल, तानाजी धोत्रे, सुभेदार दशरथ जवणे, कारागृहाचे वैद्यकीय अधिकारी संजय खंडागळे, लिपिक सादिक मुल्ला, वसंत सपकाळ, अंगद गायकवाड, मनिषा गायकवाड आदि उपस्थित होते. अंजली व नंदीनी गायकवाड यांच्या हस्ते दिपप्रज्वलन करुन या  कार्यक्रमास सुरुवात झाली.
पुढे बोलताना हभप समाधान महाराज म्हणाले, जेव्हा आपल्या हातून एखादा गुन्हा घडतो; तेव्हा गुन्ह्यास प्रवृत्त करणारे सुद्धा साथ सोडून देतात. मात्र आपले कुटूंबिय जामिन मिळावा, यासाठी प्रयत्नशील असतात. बंदी बांधवांला शिक्षा झाल्यानंतर सर्व कुटूंबिय त्याचे परिणाम भोगतात. समाजाकडून होणारी अवहेलना ते सहन करतात, असे सांगून भगवंत श्रीकृष्णाच जन्म कारागृहात झाला. मात्र ते पुन्हा कधी कारागृहात गेले नाहीत. तसेच आपले आचरण असावे, असे ते म्हणाले.
तुरुंग अधिक्षक नागनाथ सावंत यांनी कार्यक्रमाचे प्रास्तविक केले तर सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन वरिष्ठ तुरुंगाधिकारी श्यामकांत शेडगे यांनी केले.