Breaking News

उपजिल्हा रुग्णालयात औषधांचा तुटवडा

अहमदनगर, दि. 2, नोव्हेंबर - येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी आलेल्या रुग्णांना तपासणी केल्यानंतर ज्या गोळ्या दिल्या जातात, यातील  काही गोळ्या येथे उपलब्ध  असूनसुद्धा या गोळ्या न देता बाहेरून आणाव्या लागतील, असे केस पेपरवरील औषध देणार्‍या कर्मचार्‍याकडून रुग्णांना सांगितले जाते.
येथील शिवाजी सरोदे (रा. आखरभाग) हे दि. 31 ऑक्टोबर रोजी पाथर्डी येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेण्यासाठी गेले होते. डॉक्टरांनी त्यांची तपासणी केल्यानंतर  त्यांना  उपचारासाठी ज्या गोळ्या लिहून दिल्या. यातील एक गोळी येथे उपलब्ध नाही. बाहेरून आणावी लागेल, असे गोळ्या देणार्‍या खिडकीतील कर्मचारी वाळेकर यांनी सरोदे सांगितले.  तेव्हा ही गोळी हॉस्पिटलमध्ये का उपलब्ध नाही, याबाबत त्यांना विचारणा केली असता याबद्दल काही माहिती नाही. तुम्ही औषध भांडार प्रमुखांना याबाबत विचारा, असे सांगण्यात  आले.
गेल्या काही दिवसांपासून पाथर्डी येथील  उपजिल्हारुग्णालयात फक्त प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी अहमदनगर येथील जिल्हा रुग्णालयात रेफर केले जाते.
उपजिल्हा रुग्णालय हे सर्वसामान्य लोकांसाठी असले तरी या रुग्णालयात तोंड पाहून इलाज केला जातो, असा आरोप होत आहे. एखाद प्रतिष्ठित घरातील रुग्ण उपचारासाठी आला  तर त्याला लागणार्‍या सर्व गोष्टी रुग्णालयात उपलब्ध असतात. परंतु जर एखादा गरीब रुग्ण उपचारासाठी आला तर त्याला औषध उपलब्ध नसल्याचे सांगण्यात येते. गरिबांचा कमी  पैशात इलाज व्हावा, यासाठी सरकारी रुग्णालय सुरू करण्यात आली असली तरी पाथर्डी येथील सरकारी दवाखाना हा नेमका कोणासाठी आहे, असा प्रश्‍न सर्व उप जिल्हारुग्णालयाच्या कामकाजावरून उपस्थित होत आहे. पाथर्डी येथील उपजिल्हारुग्णालयात औषध उपलब्ध नसतील. तर एवढया मोठ्या हॉस्पिटलचा तालुक्याला  काय फायदा,  असा सवाल सामान्य जनता करीत आहे.