Breaking News

पोलिसांवर आली ‘अंधेरा कायम रहे’ म्हणण्याची वेळ


राहुरी प्रतिनिधी -जनतेच्या संरक्षणाची जबाबदारी असलेल्या पोलिसांना गेली काही महिन्यांपासून अंधाराच्या साम्राज्यात राहण्याची व चाचपडण्याची दुर्देवी वेळ आली आहे.या अंधाऱ्या स्थितीला दूर करण्यासाठी कोणीच वाली नसल्याचे दिसून येत असल्याने ‘अंधेरा कायम रहे’ म्हणण्याची वेळ पोलिस प्रशासनावर आली आहे.

राहुरी तहसिल कार्यालय व पोलिस ठाण्याच्या प्रवेशद्वारात तालुक्याचे आ. शिवाजी कर्डीले यांच्या स्थानिक विकासनिधीतून गेली काही वर्षापुर्वी हायमँक्स दिव्याचा खांब बसविण्यात आला होता. हायमँक्स दिव्यांच्या प्रखर प्रकाशात तहसिल व पोलिस ठाण्याचे आवार उजळून दिसत होते. तसेच रात्रीच्यावेळी प्रकाशव्यवस्था असल्याने या परिसरात महसूल व पोलिस प्रशासनाने कारवाईत पकडलेली वाहने दिसून येत होती. तसेच प्रकाशामुळे वाहनांची सुरक्षितता होत असल्याने प्रशासनही निर्धास्त असायचे. 

मात्र गेल्या काही महिन्यांपासून हा परिसर अंधारात झाकोळून गेला आहे. खांबावरिल दिवे बंद आहेत. यामुळे पोलिसांना अंधारात चाचपडण्याची वेळ आली आहे. तसेच कारवाईत पकडलेली वाहने व वाहनांचे सुटे भाग चोरी होण्याच्या घटना घडत आहेत. यामुळे महसूल व पोलिस प्रशासनावर नामुष्कीची वेळ आली आहे. अंधार असल्याने पोलिस प्रशासनास येथे अंधाऱ्या दुनियेत कामकाज करण्याची वेळ येवून ठेपली आहे. 

तहसील कार्यालयाच्या प्रवेशद्वारातील वीजेच्या खांबावरील दिवे बंदावस्थेत असल्याने यासंबंधी वेळोवेळी संबंधित विभागाला सूचित करण्यात आलेले आहे. मात्र येथील अंधाऱ्या पोलिस ठाण्याच्या आवाराकडे संबंधित विभाग कानाडोळा करत आहे. 

आ. कर्डिले यांनी हायमँक्स दिव्यांचा खांब याठिकाणी दिला खरा. पण याची दुरुस्ती देखभाल करण्याचे काम कोणाचे ? नगरपरिषेदेचे का ? सार्वजनिक बांधकाम प्रशासनाचे, असा हा सवाल उपस्थित केला जात आहे. पोलिस ठाणे परिसराचा ‘अंधेरा’ केव्हा दूर होणार, याकडे जनतेचे संरक्षण करणाऱ्या पोलिस प्रशासनाचे लक्ष लागले आहे.