Breaking News

पुलांचे बांधकाम न केल्यास तीव्र आंदोलन

सातारा, दि. 01 (प्रतिनिधी) : सातारा शहरालगत असलेल्या औद्योगिक वसाहतीतून देगावकडे जाणारा रस्ता व पूल मंजूर झाल्याचे गेले दोन वर्ष सांगितले जाते. परंतु याचे काम होणार कधी? गतवर्षी एकाचा बळी गेला होता. त्यामुळे आणखी कोणाचा जीव जाण्यापूर्वी या रस्त्यावर पडलेले लाखो खड्डे बुजवण्यची स्पर्धाच सुरु आहे. खड्डे भरले नाहीत, पुलांचे बांधकाम केले नाही तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा रिपाइंचे श्रमिक ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष मदन खंकाळ, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे कृती समितीचे उमेश चव्हाण यांनी दिला आहे.
गेंड्याच्या कातडीचे अधिकारी, निद्रिस्त झालेले स्थानिक लोकप्रतिनिधी यांच्या नावाने जो कोणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बोंब ठोकेल त्याला आकर्षक बक्षीस देण्यात येईल, असे आवाहन रिपाइंचे श्रमिक ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष मदन खंकाळ आणि लोकशाहीर अण्णा भाऊ साठे कृती समितीचे उमेश चव्हाण यांनी केले आहे.
दरम्यान या रस्त्याचे काम सुरु न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे. सातारा तालुक्यातील देगावकडे जाणारा रस्ता पूर्णत: खराब झाला आहे. राष्ट्रीय महामार्ग ओलांडल्यापासून ते देगावपर्यंत फुटाफुटाच्या अंतराने खड्डेच खड्डे पडले आहेत. या मार्गावरुन औद्योगिक वसाहतीत येणारे मोठे ट्रक तसेच महाविद्यालयीन शिक्षणासाठी जाणार्‍या विद्यार्थ्यांच्या दुचाकी यांची सातत्याने वाहतूक असते. महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाच्या अंतर्गत हा रस्ता येता. तसेच चंदननगर ओढ्यावरील पूलही येतो. या पुलाचीही दयनीय अवस्था झाली आहे. अरुंद पुलाला संरक्षक भिंती नाहीत. कठडेही अगोदरच मोडकळीस आले आहेत. त्यामुळे सातारच्या औद्योगिक वसाहतीतील हा खड्डेमय रस्ताच यमरुपी बनला आहे. हे खड्डे भरले नाहीत, पुलांचे बांधकाम केले नाही तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा खंकाळ, चव्हाण यांनी दिला आहे.