Breaking News

सरकारच्या विरोधात काँग्रेसचा ‘जनआक्रोश’

अहमदनगर, दि. 01, नोव्हेंबर - इतिहासात अहमदनगर जिल्ह्याचे महत्त्व मोठे आहे.  ऐतिहासिक वारसा असल्याने ऐतिहासिक निर्णय आणि ऐतिहासिक  उठाव या जिल्ह्यातूनच झाले आहे. सरकार विरोधामध्ये जनआक्रोश आंदोलनाची सुरुवात सुध्दा या ऐतिहासिक जिल्हयातून ऐतिहासिक  तारखेला झाली. येथून आंदोलनाची सुरुवात झाल्यावर सत्ता राहत नाही. हा पण एक इतिहासच  आहे. मोदी, फडणवीस  सरकारने धोका दिला, महात्मा गांधी, पंडित नेहरु यांनी ज्याप्रमाणे संघर्ष  केला. त्याप्रमाणे संघर्ष करावा लागणार आहे. आंधी आणि तुफानातून सरकार राहणार नाही. आता शेतकर्‍यांनी पुढे यायला पाहिजे, आम्ही ठामपणे शेतकर्‍यांच्या मागे उभे आहोत, असे काँग्रेसचे नेते, माजी मंत्री गुलाब नबी आझाद यांनी सांगितले. 
केंद्र  व  राज्य सरकार अपयशी ठरल्याची घणाघाती टीका करत राज्यातील फडणवीस सरकार नसून फसवणवीस सरकार आहे, यांना आता उलथून टाकायचे आहे. राज्यातील सरकार हे  फडणवीस सरकार नसून ते फसवणूक सरकार आहे, असाही टोला यावेळी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी मारला. तसेच जनतेचा आवाज बुलंद करण्यासाठी हा मेळावा असून ही जनआक्रोश सभा आहे.
सध्या भाजपने देशाचा आणि राज्याच्या बट्याबोळ केला आहे. नांदेडपासून भाजपच्या परतीचा प्रवास सुरु झाला आहे. देशात 12 हजार शेजकर्‍यांनी आत्महत्या केल्या. कर्जमाफी नाही हे फडणवीस सरकार नाही तर फसवणीस सरकार असल्याचे त्यांनी सांगीतले.
मंगळवारी काँग्रेस पक्षाच्या वतीने जनआक्रोश आंदोलन सुरु झाले आहे. राज्यभर हे आंदोलन होणार असून याचा शुभारंभ नगर येथे झाला. यावेळी माजी मुख्यमंत्री अशोक  चव्हाण, राज्याचे प्रभारी मोहन प्रकाश, विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे, आ. माणिकराव ठाकरे, खासदार हुसेन दलवाई, आ.अब्दुल सत्तार, आ. बाळासाहेब थोरात, आ. हर्षवर्धन पाटील, रत्नाकार महाजन, आ. शरद रनपिसे, रोहिदास पाटील, जि. प. अध्यक्षा शालिनी विखे पाटील, आ. नसीम खान, विनायक देशमुख,  आदींसह पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.
गुलाम नबी आझाद म्हणाले नगर जिल्हयाचा इतिहास हा काही तासाभरात सांगण्यासारखा विषय नाही. देशामध्ये 1440 साली निजामशहाचे राज्य होते. त्यावेळेला किल्ले बांधले गेले. या किल्ल्यातून लपण्यासाठी व हल्ले करण्यासाठी उपयोग होत होता. नंतर पेशवाई, मराठा व इंग्रज अशी सत्ता आली. इंग्रजांना देशातून हुसकवण्यासाठी काँग्रसेने विडा उचलला. 1942 साली ‘भारत छोडो’चा नारा दिला. त्यावेळी पंडित नेहरु, मौलाना आझाद, सरदार वल्लभभाई पटेल यांना जेरबंद केले.
 त्यांना नगर येथे ठेवले हा सुध्दा इतिहास आहे. येथूनच भारताची पुढची आखणी करण्यात आली. शेतकर्‍यांचे भवितव्य  हे कशा पध्दतीचे असायला पाहिजे याचा निर्धार केला गेला. त्यामुळे इंग्रजांना हाकलण्यासाठी रणनिती आखली गेली  हा इतिहास आहे, असे सांगून जिल्हयाचे महत्त्व लक्षात  घेता सध्याच्या सरकारच्या विरोधामध्ये जनआक्रोश सुरुवात झाली आहे. ज्या जिल्हयातून याची सुरुवात झाल्यावर सत्ता राहत नाही, हा पण इतिहास आहे. आधी आणि तुफानात  सरकार राहणार नाही, शेतकर्‍यांनी पुढे व्हावे, आम्ही तुमच्याबरोबर आहे, असे आझाद म्हणाले,
माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण म्हणाले की, जनतेचा आवाज बुलंद करण्यासाठी ही सभा आहे. तीनवर्षामध्ये भाजपने महाराष्ट्रात व देशात बट्टयाबोळ केला आहे. भाजपाचा परतीचा प्रवास नांदेड येथून सुरु झाला आहे. तो आता उत्तर महाराष्ट्रातून सुरु करायचा आहे. गोरगरिबांचे कल्याण करण्यासाठी आता मशाल पेटवली आहे. 2019 ची तयारी आता करायची आहे, असे  चव्हाण म्हणाले, इंग्रजांपासून गुलामगिरीतून काँग्रेसने मुक्त केले. आता भाजपालाही मुक्ती देण्याचे काम काँग्रेसलाच करावे लागणार आहे. जनतेच्या पैशांवर यांची जाहिरातबाजी, उधळपट्टी सुरु आहे. राज्यात 12 हजार शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या हे दुर्देव आहे. कर्जमाफी वेळवेर मिळाली नाही. संघर्ष यात्रा काढावी लागली. भाजपचा निर्णय फसवा आहे. फडणवीस सरकार खोटे बोलणारे सरकार आहे, दिलेले शेतकर्‍यांचे प्रमाणपत्र शेतकर्‍यांनी परत  केले  आहे.  दीड लाखाची रक्कम असताना अवघे दहा हजार दिले. ‘तारीख पे तारीख’ अशी वेळ आणून कर्जमाफीसुध्दा दिली नाही. त्यामुळे या सरकारला खाली खेचण्याशिवाय आता गप्प बसायचे नाही, असा निर्धार चव्हाण यांनी व्यक्त केला. हे सरकार फडणवीस सरकार नसून फसवणिस सरकार आहे, असे ते म्हणाले.
ऑनलाईनच्या नावाखाली शेतकर्‍यांचे अर्ज भरुन घेतले, त्यामध्ये जात विचारली जाते. ती कशासाठी, कापुस ऑनलाईन खरेदी करायचा असा आदेश काढला एकीकडे, वीज नाही, इंटरनेट सुविधा नाहीत, शेतकरी मेटाकुटीला आला. ऑनलाईन बंद करा, नाहीतर तुम्हालाच ऑफलाईन करावे लागेल अशी खरमरीत टिका चव्हाण यांनी केली. सोशल मिडीयाच्या माध्यमातून टिका होऊ लागली असताना आता टिकाकारांनाच आरोपी केले जात आहे. सरकार विरोधात बोेलला तर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करायला लागले, पत्रकारांनी छापले तर त्यांना सुध्दा दबाव टाकून याला काढुन टाका, असे हे म्हणू लागले आहेत. जर अशा पध्दतीने दाबण्याचा प्रयत्न होत असेल  तर, सहन करायचे का? असा सवाल चव्हाण यांनी केला. नांदेडच्या विजयामध्ये जनतेचा सहभाग आहे. तसाच सहभाग व्यापारांचाही आहे, जीएसटीमुळे  व्यापारी वर्गामध्ये असंतोष निर्माण झाला. जगामध्ये 28 टक्के  टॅक्स  (कर) कोठेही नाही तो भारतातच  आहे. नोटांबंदीनंतर 150 माणसे मारली गेली. सरकारवर हत्येचा गुन्हा दाखल करावा, असे चव्हाण म्हणाले. नोटाबंदीच्या विरोधात काळा दिवस आम्ही पाळणार आहोत. सर्वाचेच सोशन राज्यामध्ये चालू आहे. इंग्रजांना ‘चले जावचा नारा’ दिला. त्यानुसार जिव गेला तरी सरकारला हटवले पाहिजे, असे चव्हाण यावेळी म्हणाले,
मोहन प्रकाश यांनी नगरची गांधी व नेहरु यांचा जवळचा संबंध होता, लाहोरपेक्षा जास्त काळ नेहरु नगरला होते. आज देश इंग्रजांची दलाली करण्याच्या हातात आहे, अशी खरमरीत टिका करुन सरकार गरीब, शेतकरी, सर्वसामान्यांचा राहिला नाही, तर लुटारुंचा झाला आहे, काळेधन आणण्याचे आश्‍वासन दिले, पंधरा लाखाऐवजी आता पंधरा हजाराची मनिऑर्डर करायला सुरुवात करा असे ते म्हणाले. मोदी परदेशात जातात गळाभेट घेतात, महिलांच्याही गळाभेटी घेतात, अशी टिका करत सरकार विदेशीच्या विकासावर चालते, मोदी आणि जेटली देश विकत आहे, असा घणाघाती आरोपसुध्दा त्यांनी केला आहे.
नगरपासून राज्यातील जनआक्रोशाची सुरुवात झाली आहे. जनआक्रोश हा शब्द नाही या देशातील शेतकरी, व्यापारी, जनतेच्या मनातील निर्माण झालेली चीड आहे. सध्याचे सरकार कर्जमाफीच्या नावाखाली माफीनामे लिहून घेत असल्याचा आरोप यावेळी बाळासाहेब थोरात यांनी केला आहे.