दखल - वजाबाकीच्या राजकारणामुळं काँग्रेस अडचणीत
काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी काँग्रेसमध्ये जाण आणली होती. त्यांच्या सभा, ट्वीटरला चांगला प्रतिसाद मिळत होता. गुजरातमधील सामान्य जनता, व्यापारी भाजपवर नाराज होते. अशा वेळी काँग्रेसला 22 वर्षांनंतर गुजरातमध्ये काही तरी करून दाखविण्याची संधी होती. राहुल यांच्या नेतृत्त्वावरचा अपयशाचा शिक्का पुसण्याची संधी होती. अमित शहा हे जय शहा यांच्यामुळं अडचणीत आले होते, तर नोटाबंदी, जीएसटीमुळं मोदी यांच्याविरोधात नाराजी होती.
इतर मागासवर्गीय, दलित, मुस्लिम, पाटीदार असे समाजघटक काँग्रेसबरोबर यायला तयार होते. आतापर्यंत काँग्रेसला चांगले वातावरण होते. मागच्या निवडणुकीत काँग्रेसला 61 जागा मिळाल्या होत्या. त्यातील 14 आमदार यापूर्वीच पक्ष सोडून गेले आहेत. शंकरसिंह वाघेला यांनी स्वत: चा पक्ष काढला आहे. अशा प्रतिकूल परिस्थितीतही काँग्रेसनं भाजपपुढं आव्हान उभं केलं होतं.
मोदी व शहा यांचं गृहराज्य म्हणून या निवडणुकीकडं वेगळ्या अपेक्षेनं पाहिलं जात होतं. उत्तर प्रदेशात 403 पैकी 324 जागा मिळवणार्या भाजपला गुजरातमध्ये यशाचा आलेख त्यापेक्षा जास्त उंचवायचा होता. त्यामुळं भाजपनं 182 पैकी दीडशे जागा मिळविण्याचं उद्दिष्ठ ठेवलं होतं. अशा स्थितीत काँग्रेसनं आव्हान उभं केलं होतं; परंतु प्रत्यक्ष लढाईअगोदरच काँग्रेसच्या दुराग्रही भूमिकेमुळं त्यांनी भाजपविरोधात उगारलेली अस्त्र बुमरँगसारखी काँग्रेसवरच उलटतात, की काय अशी शक्यता निर्माण झाली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राहुल गांधी यांचे कधी नव्हे, ते कौतुक सुरू केले होते. शरद यादव यांचा जनता दल, राष्ट्रवादी काँग्रेस, पाटीदार समाज आदींसाठी जागा सोडण्याची भाषा काँग्रेसनंच सुरू केली होती. आता पहिल्या यादीतील उमेदवार जाहीर केले असले, तरी राष्ट्रवादीसोबत आघाडीची कोणतीच चर्चा करायला काँगे्रसला वेळ नाही. त्यामुळं पाटीदारांसोबतच आता राष्ट्रवादीनंही काँग्रेसविरोधी सूर आळवला आहे. गुजरात विधानसभा निवडणुकीत काँगˆेस आणि राष्ट्रवादी काँगˆेसमध्ये आघाडीबाबतची चर्चा फिस्कटली आहे. आघाडीसाठी काँग्रेस गंभीर नसून त्यांनी आघाडीचा निर्णय घेण्यासाठी चालढकल केली, असा आरोप करीत राष्ट्रवादी काँग्रेसन गुजरातमध्ये स्वबळावर निवडणूक लढवण्याची घोषणा केली.
गुजरातमध्ये काँग्रेस सोबत आघाडी करण्याबाबत चर्चा सुरू असल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी काही दिवसांपूर्वी सांगितलं होतं. त्यामुळं गुजरातमध्ये आघाडी होणार अशी चिन्हं होती. काँग्रेसनं रविवारी रात्री उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. 77 उमेदवारांना यात स्थान मिळालं आहे. काँग्रेसनं यादी जाहीर केल्याच्या पार्श्वभूमीवर सोमवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी, आम्हाला गुजरातमध्ये काँगˆेससोबत आघाडी करायची होती. आम्ही चर्चेसाठी पुढाकारही घेतला होता. मात्र, काँगˆेस आघाडीबाबत गंभीर नव्हती, म्हणूनच त्यांनी चालढकल केली, असा आरोप केला. आम्ही गुजरातमध्ये स्वबळावर लढणार असून आम्ही चांगली कामगिरी करू, असा दावा त्यांनी केला असला, तरी हा दबावाचा भाग आहे, हे उघड आहे.
गुजरातमध्ये 2002 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पहिल्यांदा निवडणुकीच्या रिंगणात उतरली होती. त्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँगˆेसचा दारुण पराभव झाला. बहुसंख्य उमेदवारांची अनामत रक्कमही जप्त झाली होती. यानंतर 2007 च्या निवडणुकीत राष्ट्रवादीनं फक्त दहा जागांवर निवडणूक लढवली. यात 3 जागांवर राष्ट्रवादीचा विजय झाला. त्यानंतर 2012 च्या निवडणुकीत राष्ट्रवादीचा दोन जागांवर विजय झाला होता. गुजरात विधानसभा निवडणुकीत हार्दिक पटेल काँग्रेसला पाठिंबा जाहीर करणार असतानाच सुरतमध्ये काँग्रेस आणि पाटीदार आंदोलन समितीच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली.
काँग्रेसनं रविवारी रात्री 77 उमेदवारांची यादी जाहीर केल्यानं पाटीदार समितीचे कार्यकर्ते नाराज असून सुरतमधील काँग्रेस कार्यालयात काम होऊ देणार नाही, असा इशाराच पाटीदार समितीनं दिला आहे. त्यामुळं आता हार्दिक पटेल पाठिंबा जाहीर करणार की नाही, याकडं सर्वांचं लक्ष लागलं आहे. गुजरातमध्ये सत्तेवर आल्यास पटेलांना आरक्षण देण्याबाबत काँग्रेसआणि हार्दिक पटेल यांच्या पाटीदार अनामत आंदोलन समितीमध्ये (पास) एकमत झाल्याची घोषणा रविवारी करण्यात आली.
या आरक्षणाबाबतचे तपशील आणि निवडणुकीत काँग्रेस पाठिंबा देण्याबाबत पासची भूमिका यासंदर्भात हार्दिक पटेल सोमवारी राजकोटमधील सभेत घोषणा करतील असंही पासचे संयोजक दिनेश भंभानिया यांनी सांगितले होतं. मात्र, रविवारी रात्री काँग्रेस विधानसभा निवडणुकीसाठी 77 उमेदवारांची यादी जाहीर केली आणि वादाची ठिणगी पडली. सुरतमध्ये पटेल समाजाचं वर्चस्व असलेल्या वरच्चा रोड या मतदारसंघातून काँगˆेसनं प्रफुल्ल तोगडिया यांना उमेदवारी दिली. रात्री उशिरा पाटीदार आंदोलन समितीचे कार्यकर्ते प्रफुल्ल तोगडिया यांच्या कार्यालयाबाहेर जमले. काँग्रेस कार्यकर्ते आणि पाटीदार समितीच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली. तिकीट वाटप करताना पाटीदार समितीकडं दुर्लक्ष केल्याचा आरोप कार्यकर्त्यांनी केला आहे. आम्हाला विश्वासात न घेता उमेदवारी जाहीर केली, असा आरोप भंभानिया यांनी केला.
आम्ही काँगˆेसच्या कार्यालयांवर हल्ला करुन विरोध दर्शवणार, असा इशाराच त्यांनी दिला. जागावाटपात जोपयर्ंत पासला योग्य स्थान मिळणार नाही, तोपयर्ंत सुरतमधील काँगˆेसच्या कार्यालयातून काम होऊ देणार नाही, असं सुरतमधील पासचे नेते धर्मिक मालवीय यांनी सांगितलं. पाटीदार आंदोलन समितीनं पाच जागांवरुन निवडणूक लढवण्याची तयारी दर्शवली होती. काँग्रेसनं जाहीर केलेल्या पहिल्या यादीत राजकोटमधील धोराजीतून ललित वसोया आणि जुनागडमधून अमित थुम्मार यांना तिकीट देण्यात आलं आहे.
हे दोघंही पासचे नेते असून उमेदवारी देताना पासच्या कोअर कमिटीला विश्वासात घेतलं नाही, असा आरोप आहे. त्याअगोदर पास नेत्यांची आणि काँग्रेसची बैठक झाली होती. या बैठकीत काँगˆेसचे गुजरातमधील प्रदेशाध्यक्ष भरतसिंह सोळंकी यांच्यासह ज्येष्ठ नेते उपस्थित होते.
हार्दिक पटेल मात्र या बैठकीत उपस्थित नव्हता. सोमवारी हार्दिक पटेल पाठिंब्याबाबत अधिकृत घोषणा करणार, असं बैठकीत ठरलं होतं. मात्र रविवारी रात्रीच्या घटनेनंतर हार्दिक पटेलनं सोमवारी संध्याकाळपर्यंत तरी कोणतीही घोषणा केली नव्हती. हार्दिकच्या एकामागून एक बाहेर येत असलेल्या सेक्स सीडी आणि त्याचे जवळचे कार्यकर्ते भाजपत जात असल्यानं हार्दिकला त्याच्या मागणीइतक्या जागा द्यायच्या नाहीत, असं काँग्रेसनं ठरविल्यानंतर हा पेच निर्माण झाला आहे, तर राष्ट्रवादीच्या दोनही आमदारांनी राज्यसभा निवडणुकीत प्रफुल्ल पटेल यांच्या सांगण्यानुसारच अहमद पटेल यांना मतदान न केल्यानं काँग्रेसचा राष्ट्रवादीवर रोष आहे; परंतु ही बेरजेची वेळ असताना काँग्रेस वजाबाकी करायला लागली, तर त्यात काँग्रेसचंच नुकसान आहे.
