Breaking News

कर्मचारी-अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या मनात जिल्हा बँकेबद्दल विश्वास वाढला : यशवंतराव गडाख

नेवासा (तालुका प्रतिनिधी):-- नगर जिल्हयातील शेतकऱ्यांच्या प्रगतीत नगर जिल्हा बँकेचा मोठा वाटा आहे. नगर जिल्हा बँकेचे कर्मचारी-अधिकारी हे अत्यंत शिस्तबद्ध, बँकेबद्दल आस्था व एकनिष्ठ असून त्यांनीच शेतकऱ्यांच्या मनात जिल्हा बँकेबद्दल विश्वास वाढला. म्हणून जिल्हा बँकेचा आज संपूर्ण महाराष्ट्रात नावलौकिक आहे. कर्तव्य दक्ष व प्रामाणिक माणसांमुळे संस्था ह्या मोठ्या होतात असे वक्तव्य ज्येष्ठ नेते माजी खासदार यशवंतराव गडाख यांनी केले.
नेवासा तालुक्यातील जेऊर हैबती येथे नगर जिल्हा सहकारी बँकेचे सेवानिवृत्त अधिकारी कारभारी रिंधे यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्याप्रसंगी ज्येष्ठ नेते गडाख बोलत होते. यावेळी महंत सुनिलगिरी महाराज, आमदार बाळासाहेब मुरकुटे, हभप नानामहाराज सुर्यवंशी, बाजार समितीचे सभापती कडूबाळ कर्डीले, विजया अंबाडे, प्रल्हाद रिंधे, बाजीराव मुंगसे, भैय्यासाहेब देशमुख, अॅड. देसाई देशमुख, लक्ष्मण काळे, पी. टी. वाकचौरे, सरपंच शोभा बाळासाहेब रिंधे उपस्थित होते.

यशवंतराव गडाख म्हणाले, "सध्या कुटुंब व्यवस्था कोसळत चाललेली असून एकमेकांबद्दल प्रेम, आदर आजच्या काळात राहिलेला नाही. ज्यांनी आपल्याला लहानाचे मोठे केले, सांभाळले अशा आई-वडिलांबद्दल कृतज्ञता व्यक्त करणे ही भावना तरुण पिढीमध्ये रूजली पाहिजे. सर्व ऐश्वर्ये आहे आणि घरामध्ये संस्कृती, शिक्षणच नाही, अशा श्रीमंतीचा काय उपयोग, म्हणून संपत्तीबरोबरच घरात शिक्षण व संस्कृतीही असली पाहिजे. साधुसंत अध्यात्माच्या, विचाराच्या माध्यमातून समाजाचे प्रबोधन करतात म्हणूनच समाज स्थिर आहे. 

हि आपली संस्कृती जपली पाहिजे महंत सुनिलगिरी महाराज म्हणाले, "नगर जिल्ह्याच्या विविध सहकार संस्था वाढविण्याचे काम स्वर्गीय मारुतराव घुले पाटील व ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांनी केले असून त्यांच्यामुळेच नेवासे तालुक्यातील शेतकर्‍यांना जिल्हा बँक ही आपली संस्था वाटत आहे. सहकारात त्यांनी दिलेले योगदानामुळे आज हजारो शेतकरी सुखावले आहे. यावेळी आमदार बाळासाहेब मुरकुटे, विजया अंबाडे, कारभारी रिंधे यांनीची भाषणे झाली.

प्रास्ताविक व स्वागत अॅड. अजय रिंधे यांनी केले. यावेळी हभप ज्ञानेश्वर महाराज तांबे, वरिष्ठ तुरुगांधिकारी रेवन्नाथ कानडे, माजी सरपंच संतोष म्हस्के, नामदेव शेळके, कोंडीराम कोलते, दिनकर गर्जे, सुभाष राख, दिगंबर रिंधे, राजेंद्र बाफना, गोरक्षनाथ कानडे, प्रवीण चोरबेले उपस्थित होते. अॅड. अजय रिंधे यांनी आभार मानले.