Breaking News

भ्रष्टाचार निवारण्यासाठी राजकीय किंमत चुकवण्याची तयारी - नरेंद्र मोदी


नवी दिल्ली : भ्रष्टाचार निवारण्यासाठी अनेक कठोर निर्णय घ्यावे लागले, ज्यामध्ये नोटाबंदी, जीएसटी, आयकर करात सुधारणा यासह अनेक महत्वपूर्ण निर्णय घ्यावे लागले, मात्र यामुळे जर आम्हाला राजकीय किंमत चुकवावी लागली, तरी मागे हटणार नाही, असे वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरूवारी काढले. 

दिल्लीतील एका कार्यक्रमात पंतप्रधान मोदी म्हणाले की, ‘देशाला एका उंचीवर नेण्यासाठी मी जो मार्ग निवडला आहे आणि त्यासाठी जी पावलं मी उचलली आहे त्यामुळे मला मोठी राजकीय किंमत चुकवावी लागेल. याची मला पूर्णपणे जाणीव आहे.’ यावेळी मोदींचा रोख पूर्णपणे नोटाबंदी आणि जीएसटीच्या निर्णयावर होणार्‍या टीकेवर होता. 

यावेळी बोलताना मोदी म्हणाले की, ‘आम्ही एका अशा व्यवस्थेकडे जात आहोत की, ज्यामुळे काळापैसा आणि भ्रष्टाचार कमी करण्यास मदत होणार आहे. जेव्हा आपण मोठ्या प्रमाणात डिजिटल व्यवहारास सुरुवात करु त्यावेळी संघटित भ्रष्टाचार बर्‍याच प्रमाणात थांबेल.’‘मोठे आणि स्थायी परिवर्तन हे असंच होत नाही. यासाठी संपूर्ण व्यवस्थेत बदल करावे लागतात. 

जेव्हा हे बदल होतात तेव्हा देश फक्त तीन वर्षात ईज ऑफ डुईंग बिझनेसच्या रँकिंगमध्ये 142 वरुन 100 वर पोहचतो.असंही मोदी यावेळी म्हणाले. गुजरात निवडणुकीच्या प्रचारात विरोधी पक्षाकडून नोटाबंदी आणि जीएसटी यावर बरीच टीका केली जात आहे. त्यामुळे याच टीकेला पंतप्रधान मोदींनी आज उत्तर दिलं आहे.