Breaking News

मनोरा पडणार म्हणून जाणीवपुर्वक झाला गैरव्यवहार !


मुंबई/विशेष प्रतिनिधी : मनोरा आमदार निवास इमारत कामात झालेल्या गैरव्यवहाराच्या चौकशी अहवालात ठपका ठेवण्यात आलेल्या अभियंत्यांवर फौजदारी दाखल करण्यासंदर्भात साबां प्रशासन मंत्र्यांच्या परवानगीची प्रतिक्षा करीत असताना आ.चरणभाऊ वाघमारे यांनी कफपरेड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्याने खळबळ उडाली आहे. दरम्यान संशयित अभियंत्यांना वाचविण्यासाठी साबां मंञालयातून धडपड सुरू असल्यामुळे परवानगी लांबविण्याचा खेळ सुरू असल्याचा संशय व्यक्त केला जातोय. .

विधानसभा अधिवेशन तोंडावर असतांना गेल्या तीन चार महिन्यांपासून चर्चेत असलेल्या शहर इलाखा साबां विभागांतर्गत मनोरा आमदार निवास इमारतीत झालेला गैरव्यवहार पोलीस ठाण्यात पोहचला आहे. आ. चरणभाऊ वाघमारे आणि दै. लोकमंथन शहर इलाखा शाखेतील या गैरव्यवहाराचा पाठपुरावा करीत असून साबां पातळीवर या गैरव्यवहारात सहभागी असलेल्या तत्कालीन कार्यकारी अभियंता प्रज्ञा वाळके यांना वाचविण्याची धडपड करीत आहे, तर दुसर्‍या बाजूला श्रीमती वाळके यांचे सहअभियंता फेगडे आणि धोंडगे यांना निलंबित करून या प्रकणावर सुरू असलेला गदारोळ शांत करण्याचा प्रयत्न साबां मंत्रालयाने प्रशासनाच्या हस्ते केला. 

तथापी या प्रकरणात असलेले गांभीर्य लक्षात घेतल्यास श्रीमती प्रज्ञा वाळके यांची अकार्यकारी पदावर बदली आणि सहअभियंत्यांना निलंबित करून प्रकरण संपविण्याइतका हा प्रकार साधा सरळ नाही. मनोरा आमदार निवास इमारतीतील आमदार कक्षाची दुरूस्ती प्रस्तावित करतांना ही इमारत नजिकच्या भविष्यात पाडली जाणार आहे, याची पुर्ण कल्पना तत्कालीन कार्यकारी अभियंता व त्यांचे सहकारी सहअभियंता यांना होती. 2014 मध्ये ही दुरूस्ती प्रस्तावित केल्यानंतर इमारतीचे अल्पायूष्य नजरेसमोर ठेऊन पुढील प्रक्रिया राबविली. या इमारतीतील अनेक आमदार कक्षांमध्ये कामे न करताच कामे केल्याची नोंद करून बीले अदा करण्यात आली. 

अंदाजपत्रकात नमूद नसलेली कामेही काही आमदार कक्षांत करून त्यांचीही बीले आपल्या मर्जीतील कंत्राटदारांना अदा करण्यात आली. सदर इमारत पाडली जाणार असल्याने कशीही कामे केली, न केलेली कामे दाखवून हवी तशी बीले काढली तरी लक्षात येणार नाही हा हेतू ठेवून या कामांची सारी राबविली गेली. या मंडळींच्या दुर्दैवाने आ.चरणभाऊ वाघमारे, माहिती अधिकार कार्यकर्ता राजू खरे आणि दै.लोकमंथनच्या लक्षात ही बाब आली. या प्रकरणाचा पाठपुरावा केल्यानंतर हाती आलेल्या कागदपत्रांवरून हे प्रकरण मुळापासून शेवटपर्यंत प्रत्येक पातळीवर संशय निर्माण करणारे आहे हे लक्षात आले.या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन आ.चरणभाऊ वाघमारे यांनी साबां प्रशासनाकडे चौकशीची मागणी केली.

प्रशासनानेही इमारत पाडली गेल्यानंतर हा गैरव्यवहार सिध्द करता येणार नाही हे गृहीत धरून सुरूवातीला आमदारांच्या तक्रारीकडे जाणीवपुर्वक दुर्लक्ष केले.साबां मंञ्यांनीही टोलवाटोलवी केली.मुख्यमंञ्यांनी आ.चरणभाऊ वाघमारे यांच्या तक्रारीची आणि लोकमंथनच्या पाठपुराव्याची दखल घेऊन केलेल्या हस्तक्षेपामुळे साबां प्रशासनाने नाईलाजास्तव केलेल्या चौकशीत प्रज्ञा वाळके,फेगडे,धोंडगे दोषी आढळले.त्यांच्यावर वेळ मारून नेण्यासाठी किरकोळ कारवाई करून वेळ मारून नेण्यात आली.

त्यानंतरही त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करावा ही मागणी मंञालयाच्या परवानगीच्या नावाखाली प्रलंबीत ठेवली गेली. अखेर आ.चरणभाऊ वाघमारे यांनी कफपरेड पोलीस ठाण्यात जाऊन श्रीमती प्रज्ञा वाळके, के.डी.धोंडगे, भुषण फेगडे या अभियंत्यासह मनिष एस कंजन, शिवगीरी कन्स्ट्रक्शन, आरगा कन्स्ट्रक्शन, आणि सुस्वागत एम.एस,एस. या कंपन्याविरूध्द संगनमत करून बनावट दस्तांच्या आधारे शासनाची फसवणूक करून शासकीय निधीचा अपहार केला म्हणून भादंवि कलम 409, 420, 465, 468, 471, तसेच लाचलुचपत प्रतिबंधक अधिनियम 1988 कलम 13(1)(क),(ड) सह 13(2) अन्वये तक्रार दाखल केली आहे. 

या प्रकरणात प्रत्येक पातळीवर संशय निर्माण होत असून साबां प्रशासनाकडून जाणीवपुर्वक कारवाई टाळली जात आहे. साबां मंत्रालयाकडे गुन्हा दाखल करण्यासाठी परवानगी मागितली आहे, परवानगी अद्याप प्राप्त झाली नाही अशी उत्तरे मिळत असतानाच हा गुन्हा दाखल झाल्याने हिवाळी अधिवेशनाच्या तोंडावर साबां प्रशासन अडचणीत आले असून अधिवेशनात मोठा गदारोळ होण्याचे संकेत आहेत.