संसदीय परंपरा आणि लोकशाहीची हत्या, सोनीया गांधी यांची टीका
काँग्रेस वर्किंग कमिटीच्या बैठकीला संबोधित करताना सोनिया गांधीही मोदी सरकारचा चांगलाच समाचार घेतला. देशात जीएसटी लागू करण्यासाठी मध्यरात्री पंतप्रधान मोदी संसदेच्या सभागृहात येतात. पण अधिवेशनात विरोधकांचा सामना करण्याचे धाडस पंतप्रधानांमध्ये नाही. सध्या देशातील वाढती बेरोजगारी, महागाई दर, निर्यात आणि जीएसटीसारखे अनेक मुद्दे आहेत.
ज्याने लाखो नागरिकांचे आयुष्य उद्ध्वस्त झाले आहे. सरकारच्या निर्णयांचा लाभ काही मुठभर लोकांनाच मिळत आहे. पण पंतप्रधान मोदी आजही खोटी आश्वासनं आणि आकडेवारी सादर करण्यापेक्षा दुसरं काहीही करत नाही आहेत. दरम्यान, सोनिया गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर इतिहासाची मोडतोड केल्याचाही आरोप केला. त्या म्हणाल्या की, देशाच्या इतिहासातील पंडित नेहरु आणि इंदिरा गांधींचं योगदान झाकोळ्यासाठी सुनियोजित पद्धतीने प्रयत्न सुरु आहेत.
शालेय पाठ्यपुस्तकातून चुकीच्या पद्धतीने इतिहास शिकवला जात आहे. यावेळी सोनिया गांधींनी गुजरात विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला चांगलं यश मिळेल, अशीही अपेक्षा व्यक्त केली. त्या म्हणाल्या की, गेल्या 18 महिन्यांपासून सुरु असलेल्या संघटनात्मक निवडणुकांमुळे काँग्रेस नेते ब्लॉक, प्रत्येक गावातील बूथ लेव्हलवरील लाखो कार्यकर्त्यांना भेटू शकले. यामुळे संपूर्ण देशात पक्षाची पाळंमुळं पुन्हा मजबूत झाली असल्याचा दावा त्यांनी यावेळी केला.
