Breaking News

सरकारने कोणाचेही बुडित कर्ज माफ केले नाही - जेटली


नवी दिल्ली : सरकार शेतकऱ्यांचे कर्ज माफ करत नाही; पण मोठ्या उद्योगपतीचे बुडीत खात्यातील कर्ज माफ करत आहे, असा अपप्रचार विरोधीपक्षांकडून केला जात असल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी सरकारने कोणाचेही बुडीत कर्ज माफ केलेले नाही, असे स्पष्टीकरण ब्लॉग लेखनाच्या माध्यमातून दिले आहे. 
भांडवलदारांची मोठी बुडीत कर्जे सरकारने माफ केली असल्याचा अपप्रचार विरोधकांकडून नेटाने केला जात आहे. बँकांच्या माध्यमातून सरकार या भांडवलदारांना दिलासा देत आहे; पण शेतकऱ्यांच्या तोंडाला मात्र पाने पुसत आहे, अशा अफवा जाणीवपूर्वक पसरवल्या जात आहेत. मात्र, सरकारने असे काहीही केलेले नाही, असे अर्थमंत्री जेटली यांनी ब्लॉगच्या माध्यमातून जनतेला सांगण्याचा प्रयत्न केला आहे. देशाने सत्य काय आहे, ते जाणून घेण्याची वेळ आली आहे. 

सत्य हेच आहे की, सरकारी बँकांकडून जी कर्जे २००८ आणि २०१४ या काँग्रेसच्या राजवटीच्या काळात वाटली गेली होती, तीच आता बुडीत खाती जमा झाली आहेत. तेव्हा जनतेने अफवा पसरवणाऱ्यांना विचारावे की, ही कर्जे कोणाच्या सांगण्यावरून वाटण्यात आली होती. तसेच जेव्हा या कर्जदारांनी कर्जे फेडण्यास दिरंगाई केली, तेव्हा तत्कालीन सरकारने त्यांच्यावर काय कारवाई केली, असे जनतेनेच त्यांना विचारावे, कारण कर्जवाटपाचे ते निर्णय काँग्रेसच्या राजवटीतच घेण्यात आले होते. 

तेव्हाच्या सरकारने कर्जबुडव्याविरोधात कडक पावले उचलण्याऐवजी ही कर्ज बिगर एनपीए गटात दाखवून झाकली मूठ सवालाखाची ठेवण्यातच धन्यता मानली, असा पलटवार जेटली यांनी टीकाकारांवर केला. आमच्या सरकारने २०१५ साली मालमत्ता गुणवत्ता आढावा घेतला, तेव्हाच बुडीत कर्जाचे प्रमाण अधिक असल्याचे निष्पन्न झाले.