Breaking News

देशाची गौरवशाली परंपरा दाखविण्यासाठी अनेक संग्रहालयांची आवश्यकता - राज्यपाल

मुंबई, दि. 11, नोव्हेंबर - संग्रहालय (म्युझियम) देशाची गौरवशाली परंपरा, ऐतिहासिक क्षण यांची माहिती नवीन पिढीला देत असतात. भारताची गौरवशाली परंपरा, सांस्कृतिक वारसा आणि ऐतिहासिक क्षणांची माहिती देण्यासाठी देशाला अनेक म्युझियमची आवश्यक असल्याचे प्रतिपादन राज्यपाल चे विद्यासागर राव यांनी  येथे केले.
भारतीय स्वातंत्र्याचा 70वा वर्धापन वर्ष साजरे करण्याच्या अनुषंगाने छत्रपती शिवाजी महाराज वस्तु संग्रहालय, ब्रिटीश म्युझियम आणि राष्ट्रीय म्युझियम, नवी दिल्ली यांच्या संयुक्त विद्यमाने छत्रपती शिवाजी महाराज वस्तु संग्रहालय येथे आयोजित केलेल्या ‘इंडिया ण्ड द वर्ल्ड : अ हिस्ट्री इन नाईन स्टोरीज’ या प्रदर्शनाचे उद्घाटन राज्यपालांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.
या प्रसंगी युकेचे डिजिटल, कल्चर, मीडिया ण्ड स्पोर्टसचे सेक्रेटरी करीन ब्रॅडली, भारतातील ब्रिटीश हायकमिशनर सर डॉमनिक अस्कुवित्थ, ब्रिटीश म्युझियमचे संचालक डॉ. हार्टविन फिश्‍चर, छत्रपती शिवाजी महाराज वास्तु संग्रहालयाचे चेअरमन एकनाथ क्षीरसागर, न्यू दिल्ली राष्ट्रीय संग्रहालयाचे महासंचालक डॉ. बी. आर. मनी, छत्रपती शिवाजी महाराज वस्तु संग्रहालयाचे महासंचालक एस. मुखर्जी तसेच मुंबईतील ब्रिटीश कौन्सिलचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
श्री. राव पुढे म्हणाले, वस्तु संग्रहालय ऐतिहासिक क्षणांची माहिती, मानवी उत्क्रांतीची आणि प्रगतीची माहिती देत असतात. भारताची ऐतिहासिक गौरवशाली परंपरा, ऐतिहासिक क्षण याची माहिती विद्यार्थ्यांना, अभ्यासकांना देश-परदेशातील नागरिकांना देण्यासाठी जगासमोर भारताचे वैभव व इतिहास माहिती होण्यासाठी अनेक म्युझियमची आवश्यकता आहे. जर म्युझियमकडे लोक आले नाही तर म्युझियम लोकांपर्यत गेले पाहिजे यासाठीही प्रयत्न होणे आवश्यक आहे. असे सांगून ते म्हणाले, महाराष्ट्रात आधुनिक संग्रहालये चालू व्हावी यासाठी महाराष्ट्रातील 20 विद्यापीठांत संग्रहालयासंदर्भातील अभ्यासक्रम सुरु करणे, कर्मचार्‍यांना प्रशिक्षण देण्यासाठी एक नियोजनबद्ध कार्यक्रम आखण्याबाबत विद्यापीठांच्या कुलगुरुंना आपण सांगणार आहोत.
नुकतेच राजभवन येथे ब्रिटीश कालखंडातील भूमीगत बंकर सापडले आहेत. ते 20व्या शतकातील शेवटच्या कार्यकाळातील असावे. या बंकर्सना नुतनीकरण करण्याचे काम करत आहोत. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या सहाय्याने महाराष्ट्राचा इतिहास आणि सांस्कृतिक वारसाचे दर्शन घडविण्यासाठी आधुनिक थ्री डी तंत्रज्ञानाचा वापर करणार आहोत, असेही राज्यपाल श्री. राव यांनी सांगितले. अशा प्रकारचे प्रदर्शन आयोजन केल्याबद्दल त्यांनी आयोजकांचे अभिनंदन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री. क्षीरसागर यांनी केले.