Breaking News

कपाशीवर बोंडअळीची ‘संक्रांत’ उत्पादन आले निम्यावर

कोपरगाव ता. प्रतिनिधी दि.२८ - दरवर्षी पर्जन्यमानाची अवकृपा, नैसर्गिक आपत्ती, सदोष बियाणे अशा या ना त्या कारणाने शेती व्यवसाय आणि शेतकरी संक्रमण काळातून वाटचाल करत आहे. यंदाही उशिरा पावसाचे आगमन झाले. शेतकऱ्यांनी हंड्याने पाणी घालून कपाशीची रोपे जगवली. मात्र पिक पदरात आले तर त्यावर बोंडअळीची ‘संक्रांत’ आल्यामुळे उत्पन्नात मोठी घट झाल्याची व्यथा येथील बोलकीचे शेतकरी अनिल महाले यांनी ‘दै. लोकमंथन’शी बोलतांना व्यक्त केली.



महाले यांनी १८ एकर क्षेत्रावर कपाशीची लागवड केली. सुरुवातीला पाऊस नसल्याने अगदी मोठ्या मेहनतीने रोपे जगवून मोठी केली. किटकनाशकांच्या महागड्या फवारण्यादेखील केल्या. या झाडांना कैरी लागुन त्यातुन कापुसही बाहेर पडला आहे. मात्र बोंडअळीचे मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले आहे. त्यामुळे त्यांच्या संपूर्ण कपाशीच्या क्षेत्रावर संक्रातच आली आहे. 


दरवर्षी एक एकर क्षेत्रात १८ ते २० क्विंटल निघणारा कापूस अवघा ७ ते ८ क्विंटलवर येऊन ठेपला आहे. निघालेल्या कापसावरही रोगाच्या प्रादुर्भावामुळे तांबडा रंग चढल्यामुळे बाजारात व्यापारी ठरविल, त्या भावात विकावा लागत आहे. मात्र अशा दारुण परिस्थितीतही तालुक्याचा कृषी विभाग झोपलं आहे. कृषी विभागाच्या या नाकर्तेपणाच्या भूमिकेमुळे पंतप्रधान कृषी पिक विमा योजनेची रक्कम भरुनही पदरात काही पडेल की नाही, याची चिंता शेतकऱ्यांना लागली आहे.

१८ एकर कपाशीच्या क्षेत्रातून दरवर्षी खर्च वजा जात नऊ ते साडेनऊ लाख उत्पन्न मिळत असते. परंतु यावर्षी त्यात सहा ते सात लाखांची घट होणार आहे. परिसरात सर्वच शेतकऱ्यांना कपाळाला हात लावण्याची वेळ आली आहे. मात्र अद्यापही कृषी विभागाचे कोणीही पाहणी करण्यास फिरकले नाही. त्यामुळे नुकसानीची ही गंभीर बाब विमा कंपनीच्या कानावर गेली नाही तर नुकसानभरपाई मिळणेही कठीण आहे. पिक उभे आहे, कृषी विभागाने दखल घ्यावी. - अनिल महाले, शेतकरी, बोलकी ता. कोपरगांव.

बोंडअळीने संपूर्ण तालुक्यातीलच क्षेत्र बाधित झालेले आहे. कपाशीच्या तक्रारी येण्यास सुरुवात झाली आहे. शेतकऱ्यांनी तालुका कृषी अधिकारी किंवा मंडलधिकारी यांचेशी संपर्क साधून त्वरीत आपली तक्रार लेखी स्वरुपात द्यावी. म्हणजे संबंधित क्षेत्राचे पंचनामे त्वरीत करता येतील.- मनोज सोनवणे, तालुका कृषी अधिकारी, कोपरगाव.