Breaking News

मनपाची लाचखोर महिला लिपीक एसीबीच्या जाळ्यात

नागपूर, दि. 02, नोव्हेंबर - नागपूर महापालिकेच्या निलंबित अभियंत्याकडून 2 हजार रुपयांची लाच स्वीकारताना आज लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मनपातील एका महिला  लिपीकाला पकडले आहे. बबीता मनोज बक्सरे असे या लाचखोर महिलेचे नाव असून तिच्या विरोधात सदर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
यासंदर्भात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून (एसीबी) मिळालेल्या अधिकृत माहितीनुसार नागपूर महापालिकेच्या अतिक्रमण विभागातील स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक असलेले  रामेश्‍वर नंदनवार सध्या मनपाच्या सेवेतून निलंबित आहेत. नंदनवार निलंबित असल्यामुळे त्यांना वेतनाच्या 50 टक्के भत्ता त्यांना दिला जातो. परंतु, निलंबनाचा कालावधी तीन  महिन्यांहून अधिक असल्यामुळे वेतनाच्या 75 टक्के भत्ता मिळावा यासाठी त्यांनी मनपा आयुक्तांकडे रितसर अर्ज केला होता. त्यांच्या अर्जावर आयुक्तांनी अनुकूल शेरा लिहून दिला .  त्यानंतर नंदनवार यांनी सदर अर्ज मनपाच्या बाजार समितीमध्ये कनिष्ठ लिपीक पदावर कार्यरत असलेल्या बबीता मनोज बक्सरे यांना दिला. बक्सरे यांनी वेतन भत्ता आणखी 25  टक्के वाढवून देण्यासाठी त्यांच्याकडे 5 हजार रुपयांची मागणी केली. मात्र, तक्रारकर्ते नंदनवार यांना हे पैसे द्यायचे नसल्यामुळे त्यांनी याबाबत एसीबीकडे तक्रार केली.
त्यानुसार एसीबीचे अधीक्षक पी.आर. पाटील यांच्या मार्गदर्शनात सापळा रचण्यात आला. दरम्यान तक्रारकर्त्यांनी बबीता बक्सरे यांच्याशी लाचेच्या रकमेसंदर्भात वाटाघाटी केली.  त्यानुसार दोन हजार रुपये देण्याचे ठरले. नियोजीत सापळ्यानुसार आज, गुरुवारी नंदनवार यांनी बक्सरे यांना कार्यालयात जाऊन दोन हजार रूपये दिले. बक्सरे यांनी पैसे स्वीक ारताच दबा धरून बसलेल्या एसीबीच्या पथकाने धाड टाकून पैसे जप्त केलेत. तसेच त्यांच्या विरोधात लाचलुचपत प्रतिबंधक कायदा 1988 अनुसार नागपुरातील सदर पोलिसात  गुन्हा दाखल केले. दरम्यान संध्याकाळनंतर महिलांना अटक करता येत नसल्यामुळे बक्सरे यांना नोटीस बजावण्यात आली आहे. त्यांना उद्या, गुरुवारी अटक होण्याची शक्यता  आहे.