Breaking News

माजी आ. रमेश कदम 4 नोव्हेंबरला काँग्रेसमध्ये प्रवेश करणार

रत्नागिरी, दि. 02, नोव्हेंबर - चिपळूणचे माजी आ. रमेश कदम यांचा काँग्रेस प्रवेश येत्या 4 नोव्हेंबर रोजी होणार आहे. महाड (जि. रायगड) येथे आयोजित करण्यात आलेल्या का ँग्रेसच्या मेळाव्यात हा प्रवेश होणार आहे. कदम 18 वर्षांनंतर पुन्हा काँग्रेसमध्ये परतणार असल्यामुळे जिल्ह्यात काँग्रेसला बळ मिळण्याची अपेक्षा आहे. राष्ट्रवादीतून भाजपमध्ये त्यांनी  प्रवेश केला होता; परंतु अलीकडेच त्यांनी भाजपचाही राजीनामा दिला होता.
रमेश कदमांची राजकीय कारकीर्द काँग्रेसमधून सुरू झाली. शरद पवार मध्ये 1999 काँग्रेसमधून बाहेर पडल्यानंतर त्यांच्याबरोबर राज्यातील अनेक नेते व कार्यकर्त्यांनी काँग्रेसची  साथ सोडली. त्यामध्ये रमेश कदमांचा समावेश होता. चिपळूणमधील राष्ट्रवादीचे संस्थापक अशी त्यांची ओळख होती. माजी मंत्री भास्कर जाधव यांच्याबरोबर त्यांचे राजकीय वैर  आहे. जाधव शिवसेनेतून राष्ट्रवादीत आल्यानंतरही दोघांमधील वाद कायम राहिले. संस्थापक सदस्य असूनही आपल्यावर पक्षाने वारंवार अन्याय केल्याचे कदम यांचे म्हणणे होते.  शेकापच्या तिकिटावर त्यांनी लोकसभेची निवडणूक लढवली. त्यानंतर पुन्हा ते राष्ट्रवादीत सक्रिय झाले. चिपळूण पालिका निवडणुकीची जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आली. या  निवडणुकीत राष्ट्रवादीचा पराभव झाल्यानंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. केवळ आठ महिन्यांनंतर कदमांनी भाजपला रामराम केला. आता 18 वर्षांनंतर ते आता पुन्हा काँग्रेसमध्ये  सक्रिय होणार आहेत. महाड येथे होणार्‍या काँग्रेसच्या मेळाव्यात कदम आपल्या निवडक कार्यकर्त्यांसह प्रवेश करतील. त्यानंतर कदम चिपळुणात काँग्रेसचा मेळावा घेणार आहेत.  मेळाव्याला प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्यासह काँग्रेसचे ज्येष्ठ नेते उपस्थित राहतील.
दरम्यान, रमेश कदम यांनी काँग्रेसमध्ये दाखल होण्याचा चांगला निर्णय घेतला आहे. त्यांचे आम्ही खुल्या मनाने पक्षात स्वागत करू. विरोधी पक्षांबरोबर लढण्यासाठी त्यांच्या रूपाने  काँग्रेसला सक्षम नेता मिळाला आहे. त्यांना बरोबर घेऊन आम्ही जिल्ह्यात काँग्रेस वाढवू, अशी प्रतिक्रिया जिल्हा काँग्रेसचे माजी उपाध्यक्ष इब्राहिम दलवाई यांनी व्यक्त केली आहे.