Breaking News

चिखली खाजगी बाजार समितीच्या अनागोंदी कारभाराची चौकशी तात्काळ करावी

बुलडाणा, दि. 06, नोव्हेंबर - चिखली एम.आय.डी.सी. मध्ये महाराजा अग्रसेन खाजगी बाजार समिती सुरु आहे तर पणन विभागाने लायसन्स देवून खाजगी बाजाराची निर्मिती करण्यात आली आहे. परंतु या खाजगी बाजार समितीमध्ये अनागोंदी कारभार होत असल्याने या अनागोंदी कारभाराची चौकशी करावी व खाजगी बाजाराचे लायसन्स रद्द करावे अशी मागणी रयत क्रांती संघटनेचे दिपक सुरडकर  यांच्यासह कार्यकर्त्यांनी कृषी पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्याकडे केली आहे. तक्रारीमध्ये खाजगी बाजारात समितीमध्ये विक्रीसाठी येणार्‍या शेतमालाचा लिलाव केला जात नाही परिणामी शेतकर्‍यांची फसवणूक केली जात आहे. 
सदर खाजगी बाजाराचा मालक अग्रवाल असल्याचे निवेदनात नमूद आहे. तसेच खाजगी बाजार समितीच्या कागद पत्रामध्ये खोडतोड करून क्षेत्र वाढवलेले आहे. तर खाजगी बाजारासाठी आवश्यक असलेली जमिन 5 एक्कर नसतांना देखील खोडतोड करून लायसन्स मिळवले असल्याचा आरोप निवेदनात तक्रारी मध्ये केला आहे. तसेच बाजार समितीमध्ये लिलाव होत नसून व्यापारीही खरेदीसाठी येत नाहीत. अग्रवाल यांनी खाजगी बाजार समितीचे लायसेन्स घेतांना हॉटेललाच निवासस्थानी दाखवलेे आहे. खरे हॉटेलींग/लॉजींग व लग्र कार्यासाठी मंगल कार्यालय म्हणून त्याचा वापर केला जात आहे. सदर हॉटेलमध्ये शेतकर्‍यांना प्रवेश ही करु दिला जात नाही, ही सत्यता आहे. तसेच या निवेदनामध्ये खाजगी बाजारामध्ये शेतकर्‍यांच्या शेतमालाला खरेदी विक्रीला प्राधान्य न देता कापसावर जिनींग करून प्रक्रिया करण्याचा उद्योग चालविला जात आहे. तसेच खाजगी बाजारात झालेल्या व्यवहाराचे बाजार भाव ऑनलाईन प्रसिध्द केल्या जात नाही. यासह अशा अनेक मुद्दे या बाजार समितीच्या विरोधात या निवेदनामध्ये नमूद केलेले आहे.
याची सखोल चौकशी व्हावी व खाजगी बाजार समितीचे लायसन रद्द करावे अशी मागणी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत व जिल्हा उपनिबंधक बुलडाणा यांच्याकडे रयत क्रांती संघटनेचे युवा कार्यकर्ते दिपक सुरडकर यांनी एका निवेदनाद्वारे केली आहे. यावेळी रयत क्रांती संघटनेचे विदर्भ अध्यक्ष प्रशांत ढोरे पाटील, विनायक सरनाईक, विलास तायडे, सचिन पडघान, भरत जोगदंडे, अनिल चौहान अशो सुरडकर, प्रविण झगरे, पंकज लंबे, अमोल व्यवहारे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.