Breaking News

शेतीच्या योजनांची माहिती तळागाळापर्यंत पोहोचवा - डॉ. सुभाष भामरे

धुळे, दि. 06, नोव्हेंबर - शेतकरी, सर्वसामान्य जनतेच्या कल्याणासाठी सरकारच्या विविध योजना आहेत. या योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी या योजनांची माहिती शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्यासाठी प्रत्येक विभागाच्या अधिकार्‍यांनी प्रयत्न करावेत. लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत मेळाव्यांचे आयोजन करावे, असे निर्देश जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समिती (दिशा) अध्यक्ष तथा केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांनी येथे दिले. जिल्हा परिषदेच्या सभागृहात जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समितीची (दिशा) बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी डॉ. भामरे हे अध्यक्षस्थानावरुन बोलत होते.
यावेळी मंत्री डॉ. भामरे म्हणाले, केंद्र सरकारच्या माध्यमातून शेतकर्‍यांच्या विकासासाठी विविध योजना राबविण्यात येतात. त्यामुळे कृषी विभागासह सर्वच विभागांनी आपापल्या योजनांच्या प्रचार व प्रसिध्दीसाठी मेळाव्यांचे आयोजन करावे. कृषी विभागाने मागेल त्याला शेततळे योजनेच्या पूर्ततेसाठी गावस्तरावर लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत मेळाव्यांचे आयोजन करावे. या मेळाव्यांच्या माध्यमातून शेतकर्‍यांचे प्रबोधन करावे. तसेच जिल्हा विकास व सनियंत्रण समितीच्या सभेत दिलेल्या सूचनांवर महिनाभरात कार्यवाही झाली पाहिजे. तसा अहवाल नोडल अधिकार्‍यांनी सादर केला पाहिजे. आणि सूचनांचे पालन केले नाही, तर संबंधित विभागांच्या वरीष्ठांना कळविण्यात येईल. तसेच मुद्रा योजनेचा लाभ अधिकाधिक लोकांना मिळवून देण्यासाठी बँक अधिकारी व लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत बैठकीचे आयोजन करावे. त्यासाठी अग्रणी बँकेने पुढाकार घ्यावा. या बैठकीत मुद्रा योजनेचा लाभ मिळविताना येणार्‍या अडचणींवर मार्ग काढण्यात येईल, असेही मंत्री डॉ. भामरे यांनी सांगितले.