Breaking News

वसंतदादा साखर कारखान्यासमोर गुरूवारपासून ठिय्या; सेवानिवृत्त कर्मचा-यांचा इशारा

सांगली, दि. 06, नोव्हेंबर - वसंतदादा शेतकरी सहकारी साखर कारखान्याकडील सेवानिवृत्त कर्मचा-यांची देणी तातडीने देण्यात यावीत, या मागणीसाठी गुरूवार 9 नोव्हेंबरपासून साखर कारखाना कार्यालयासमोर बेमुदत ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा सेवानिवृत्त कर्मचार्यांच्या वतीने देण्यात आला.
मुंबई येथील श्री दत्त इंडिया कंपनीने वसंतदादा शेतकरी साखर कारखाना भाडेकराराने चालविण्यास घेतला होता. या भाडेकरारात या साखर कारखान्याकडील सर्व जुनी देणी ही कंपनी देणार असल्याचे मान्य करण्यात आले होते. मात्र प्रत्यक्षात आजअखेर सुमारे 700 सेवानिवृत्त कर्मचार्यांची कोणतीही देणी देण्यात आलेली नाहीत. याविरोधात वारंवार निवेदने व चर्चाही संबंधित कंपनीच्या व्यवस्थापनाशी करण्यात आली होती. परंतु संबंधितांकडून चालढकलपणा सुरू होता.
या सेवानिवृत्त कर्मचा-यांच्या थकित फंड व ग्रॅच्युईटी रकमेबाबत वसंतदादा कामगार भवनात व्यापक बैठक पार पडली. या बैठकीनंतर संतप्त सेवानिवृत्त कर्मचार्यांनी श्री दत्त इंडिया कंपनीच्या कार्यालयासमोर जाऊन जोरदार घोषणाबाजी करीत ठिय्या मारला.
त्यावेळी कंपनी व्यवस्थापनाने आम्ही सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेशी करार केला आहे. त्यात 1 जुलै पूर्वीची कोणतीही देणी देणे लागत नाही, असे सांगत या कर्मचा-यांसमोर करारपत्र ठेवले. कंपनी व्यवस्थापनाच्या या भूमिकेमुळे कर्मचारी अधिकच संतप्त झाले. त्यांनी आपण देणी देणार नसाल, तर या साखर कारखान्याचा बॉयलर व यंत्रसामुग्री कशासाठी वापरता, असा प्रश्‍न उपस्थित करीत कंपनी व्यवस्थापनाने चुकीची भूमिका घेतल्यास तीव्र आंदोलन उभारण्याचा इशारा सेवानिवृत्त कर्मचा-यांनी दिला.
सेवानिवृत्त कर्मचा-यांचा रूद्रावतार पाहून साखर कारखान्याचे अध्यक्ष विशाल पाटील, श्री दत्त इंडिया कंपनीचे संचालक जितेंद्र धारू, उपाध्यक्ष मृत्युंजय शिंदे,ड. के. डी. शिंदे व प्रदीप शिंदे यांची बैठक झाली. या बैठकीत कंपनी व्यवस्थापनाने नरमाईची भूमिका घेत लवकरच दिलीप पाटील यांची वेळ घेऊन बैठक घेतली जाईल. त्यात जो निर्णय होईल, तो कंपनी व्यवस्थापनाला मान्य असेल व त्यानुसार सेवानिवृत्त कर्मचा-यांची देणी अदा केली जातील, असे आश्‍वासन दिले. कंपनी व्यवस्थापनाच्या या निर्णयामुळे सेवानिवृत्त कर्मचारी पुन्हा आक्रमक झाले. त्यांनी श्री दत्त इंडिया कंपनी व जिल्हा मध्यवर्ती बँक काय निर्णय घेतात, ते घेऊ द्या, आपल्या थकित देणीसाठी 9 नोव्हेंबरपासून बेमुदत ठिय्या आंदोलन उभारण्याचा इशारा दिला.