Breaking News

नंदुरबार जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्नशील - जयकुमार रावल

नंदुरबार, दि. 06, नोव्हेंबर - नंदुरबार जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी आपण प्रयत्नशील आहोत, असे प्रतिपादन जिल्ह्याचे पालकमंत्री तथा रोजगार हमी योजना व पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांनी केले.
श्री सातपुडा तापी परिसर सहकारी साखर कारखाना, पुरुषोत्तमनगर, शहादा येथे संगणकीकृत ऊस वजन काटा पूजन कार्यक्रम, गाळप हंगाम शुभारंभच्या उदघाटनप्रसंगी पालकमंत्री रावल हे बोलत होते.
रावल म्हणाले, पी. के. अण्णा पाटील यांच्याशी आमचे ऋणानुबंध होते. त्यांनी सहकार क्षेत्राच्या माध्यमातून नंदुरबार जिल्ह्याच्या विकासासाठी प्रयत्न केले. अनेकांना रोजगाराची संधी उपलब्ध झाली. कारखाना सुरू राहिला, तर अर्थव्यवस्थेला चालना मिळेल. त्यामुळे आमची नेहमीच सहकार्याची भूमिका राहिली आहे.
नंदुरबार- धुळे जिल्ह्यातील उपसा सिंचन योजनांमुळे सुमारे 15 हजार हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे. या योजना कार्यान्वित करण्यासाठी राज्य शासनाचे प्रयत्न सुरू आहेत. सुलवाडे- जामफळ उपसा सिंचन योजना केंद्र सरकारच्या निधीतून कार्यान्वित करण्यासाठी पाठपुरावा सुरू आहे. राज्य सरकारने दुष्काळ निवारणसाठी 10 हजार कोटी रुपयांचे, तर शेतकरी कर्जमुक्तीसाठी सुमारे 30 हजार कोटी रुपयांचे पॅकेज दिले. याशिवाय शेतकर्‍यांना सिंचनाची सुविधा उपलब्ध व्हावी म्हणून जलयुक्त शिवार अभियान राबविण्यात येत आहे.
सारंगखेडा येथे भरणार्‍या यात्रेचे ब्रॅण्डिग करण्यात येत आहे. या यात्रेची माहिती आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचविण्यात येत आहे. राजस्थानातील पुष्करच्या धर्तीवर या यात्रेची माहिती पर्यटकांना व्हावी म्हणून पर्यटन विभागाचे प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी यंदा साडेचार कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. नंदुरबार जिल्ह्यातील होळी उत्सवाचेही ब्रॅण्डिग करण्यात येत आहे. त्यामुळे या भागात पर्यटनाला चालना मिळून रोजगाराची निर्मिती होणार आहे, असेही पालकमंत्री रावल यांनी नमूद केले.
जलसंपदा मंत्री महाजन म्हणाले, प्रतिकूल परिस्थितीत कारखाना चांगल्या पध्दतीने सुरू आहे. कारखान्यास ऊस पुरवठा करणार्‍या शेतकर्‍यांचे कौतुक केले पाहिजे. शेतकरी टिकविण्यासाठी कारखाने सुरू राहिले पाहिजेत. शेतकर्‍यांच्या शेतापर्यंत पाणी पोहोचविण्याचे नियोजन केले. उपसा सिंचन योजनेची कामे लवकरच मार्गी लागतील. पाण्याची बचत करण्यासाठी सूक्ष्म सिंचन, ठिबक सिंचनाचा वापर वाढवावाच लागेल. तसेच ठिबकमुळे उत्पादनातही वाढ होते. शेतकरी केंद्रबिंदू मानून राज्य सरकार नेहमीच शेतकरी हिताचाच विचार करीत आहे. शेतकर्‍यांचे उत्पादन दुपट करण्यासाठी सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. तापी- बुराई योजनेच्या कामाला गती दिलेली आहे. शेतकर्‍यांसाठी जलयुक्त शिवार अभियान सुरू केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्यकारी संचालक पी आर पाटील यांने केले व संचालक मंडळ सदस्य रतिलाल पाटील यांनी आभार मानले.