Breaking News

सांगली पोलिसांवर घातपाताचा आरोप

सांगली, दि. 08, नोव्हेंबर - वाटमारीच्या गुन्ह्यात सांगली शहर पोलिसांच्या कोठडीत असलेल्या दोघा आरोपींनी सोमवारी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास गुन्हे प्रकटीकरण  (डीबी) शाखेचे प्रमुख वरिष्ठ पोलिस उपनिरीक्षक युवराज कामटे यांच्यासह पाच ते सहा पोलिस कर्मचा-यांच्या हातावर तुरी देऊन पलायन केले. मात्र आपल्या मुलांचा घातपात  झाल्याचा संशय व्यक्त करीत त्यांच्या आई- वडिलांसह अन्य नातेवाईकांनी मंगळवारी दुपारपासून रात्री उशिरापर्यंत पोलिस ठाणे आवारात जोरदार गोंधळ घातला. पोलिस  ठाण्यासमोरील मुख्य रस्त्यावर ठिय्या मारून संबंधित पोलिस अधिका-यांवर कारवाई करण्याची मागणी केली. 
या घटनेची माहिती मिळताच भारतीय जनता पक्षाचे नेते आमदार सुधीर गाडगीळ, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष विश्‍वजित कदम व सांगली महापालिकेचे महापौर हारूण शिक लगार यांनी शहर पोलिस ठाण्यात धाव घेऊन तपासाबाबत सूचना केल्या. सांगली शहर पोलिस उपअधिक्षक डॉ. श्रीमती दीपाली काळे यांनी यातील एका आरोपीला अटक करण्यात  आली असून त्याला लवकरच सांगलीत आणले जाणार असल्याचे सांगितले. या घटनेने सांगली जिल्हा पोलिस यंत्रणा खडबडून जागी झाली असून सांगली शहर पोलिस ठाणे प रिसरात दिवसभर तणावपूर्ण वातावरण होते.
सांगली- कोल्हापूर रस्त्यावरील वाटमारीप्रकरणी अनिकेत अशोक कोथळे (वय 26) व अमोल सुनील भंडारे (वय 23, दोघेही रा. भारतनगर, कोल्हापूर रस्ता, सांगली) या दोघांना  सांगली शहर पोलिसांनी अटक केली होती. त्यांना येथील न्यायालयाने तीन दिवसांची पोलिस कोठडी दिली होती. या चोरीचा तपास युवराज कामटे यांच्याकडे होता.
या गुन्ह्याकामी पुढील तपासासाठी सोमवारी रात्री युवराज कामटे यांनी अनिकेत कोथळे व अमोल भंडारे यांना शहर पोलिस ठाण्याकडील कोठडीतून आपल्या कार्यालयात आणले  होते. पोलिस चौकशीवेळी या दोघांना बेदम मारहाण करण्यात आल्याची चर्चा दबक्या आवाजात आहे. या मारहाणीत एकजण बेशुध्द पडल्याने त्याला वारे लागावे, या उद्देशाने पोलिस  ठाण्याच्या पायरीवर खुल्या जागेत बसविण्यात आले होते, तर काहीजण पाणी आणण्यासाठी गेले होते. हीच संधी साधून या दोघांनीही आता पुन्हा पोलिस मारहाण करतील, या  भीतीने पळ काढल्याची चर्चा आहे. मात्र पोलिस दप्तरी या दोघांना युवराज कामटे यांच्या कार्यालयात नेत असताना त्यांनी पोलिस कर्मचार्याला हिसडा मारून अंधाराचा फायदा घेऊन  पलायन केल्याचे म्हटले आहे.
रात्र गस्तीवर असलेल्या दीपाली काळे शहर पोलिस ठाण्यात आल्या असता हे दोन्हीही आरोपी पोलिस कोठडीत नसल्याचे त्यांच्या लक्षात आले व त्यांनी याबाबत विचारणा केली  असता संबंधित पोलिस अधिकारी व कर्मचार्यांना चांगलाच घाम फुटला. अचानक घडलेल्या या प्रकाराने शहर पोलिस ठाण्यात एकच खळबळ उडाली. आरोपींच्या पलायनाने  खडबडून जागे झालेल्या पोलिस कर्मचार्यांची चांगलीच धावपळ उडाली. पोलिसांनी तात्काळ हालचाल करून या दोघांचा शोध घेण्याचाही प्रयत्न केला. त्यासाठी ठिकठिकाणी नाक ाबंदी मोहिमही हाती घेण्यात आली. मात्र हे दोघे काही मिळून आले नाहीत. याबाबत युवराज कामटे यांनी शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून अधिक तपास पोलिस  उपनिरीक्षक एस. एस. चव्हाण करीत आहेत.