उद्योजकाला खंडणी मागणारा दुसरा आरोपीही अटकेत
औरंगाबाद, दि. 08, नोव्हेंबर - शहरातील उद्योजक राहुल पगारिया यांना सात लाखांची खंडणी मागितल्याच्या प्रकरणी गुन्हे शाखा पोलिसांनी सुरेश नरवडे या दुस-या आरोपीलाही अटक केली आहे. 19 ऑक्टोबर रोजी एका रिक्षा चालकाने पगारिया शोरूमवर एका लिफाफ्यात पत्र दिले. यापत्राद्वारे सात लाखांची खंडणी मागण्यात आली होती. पैसे दिले नाही तर कुटुंबातील सदस्यांना जिवे मारण्याची धमकीही देण्यात आली होती. या प्रकारानंतर उद्योजक राहुल पगारिया यांनी पोलिसांना माहिती दिली होती. सीसीटीव्हीच्या आधारे फुटेज तपासून रिक्षा चालकाला शोधून काढले. पहिल्यांदा शेख चांद या रिक्षा चालकाला अटक करण्यात आली होती. आता त्याचा साथीदार नरवडेलाही अटक झालेली आहे. दोन्ही आरोपींना न्यायालयाने दहा नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.