Breaking News

अमेरिकेत भारतीयाची गोळी घालून हत्या


अमेरिकेच्या मिसिसिपी राज्यात लुटमार करत एका २१ वर्षीय भारतीय व्यक्तीची त्याच्या घरासमोर गोळी घालून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली. संदीप सिंग असे ठार झालेल्या युवकाचे नाव आहे. चिंताजनक बाब म्हणजे काही दिवसांपूर्वीदेखील चार सशस्त्र दरोडेखोरांनी अन्य एका भारतीय विद्याथ्र्याची हत्या केली होती.

मिसिसिपीच्या जॅक्सन शहरात रविवारी लूटमारीदरम्यान एका चोरट्याने संदीप सिंगच्या पोटात गोळी मारण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. सिंग आणि दोन अन्य व्यक्ती आपापल्या घरासमोर थांबले होते. त्याचवेळी एक नकाबधारी व्यक्ती त्याच्याजवळ आला. सिंगकडून पैसे आणि फोन काढून घेऊन फरार होत असताना चोरट्याने त्याच्यावर गोळी झाडली.


 यामध्ये गंभीर जखमी झालेल्या सिंगला तातडीने मिसिसिपी वैद्यकीय केंद्रात घेऊन जाण्यात आले; परंतु सोमवारी त्याने उपचारादरम्यान रुग्णालयात शेवटचा श्वास घेतला. सिंग जवळपास चार वर्षांपूर्वी पर्यटन व्हिसावर अमेरिकेत आला होता. नंतर त्याला या ठिकाणी कामाचा परवाना मिळाला होता. सिंग हा मूळचा पंजाबमधील आहे.