Breaking News

नगरमध्ये भल्या पहाटेपासून अनधिकृत धार्मिक स्थळे हटविण्याची कारवाई

अहमदनगर, दि. 03, ऑक्टोबर - उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार अहमदनगर शहरातील अनधिकृत धार्मिक स्थळे हटविण्याच्या कारवाईच्या दुस-या टप्प्याला महापालिकेने गुरू वारी भल्या पहाटेच सुरूवात केली. नगर-कल्याण महामार्गावर दिनेश हॉटेल जवळील लक्ष्मी माता मंदिर व जाधव पेट्रोल पंपाजवळ असणारे मोहटा देवी मंदिर असे 2 धार्मिक स्थळ  काढण्याची कारवाई मनपा च्या अतिक्रमण विरोधी विभागाने केली. कारवाईच्या वेळी विरोध करणा-या 10-12 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले.
उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार, अहमदनगर शहरात 29 सप्टेंबर 2009 नंतर बांधण्यात आलेली 4 अनधिकृत धार्मिक स्थळे काढण्याची कारवाई डिसेंबर 2016 मध्येच पूर्ण  करण्यात आली होती.कारवाईच्या दुसर्या टप्प्यात रस्त्यांवरील,वाहतुकीला अडथळा ठरणारी व पदपथावर बांधण्यात आलेली 68 धार्मिक स्थळे काढण्याच्या कारवाईचे नियोजन  महापालिकेने केले आहे. सहाय्यक पोलीस अधिक्षक अक्षय शिंदे,तोफखाना पोलीस ठाण्याचे निरीक्षक पांडुरंग पवार,कोतवालीचे निरीक्षक अभय परमार,दंगल नियंत्रण पथक  आदिंसहीत सुमारे 100 हून अधिक पोलीस कर्मचारी बंदोबस्तासाठी नियुक्त करण्यात आले होते.नगर-कल्याण रस्त्यावरील मंदिरे काढण्याच्या वेळी विरोध करणा-या 10-12  जणांना पोलीसांनी रात्रीच ताब्यात घेतले होते.
बुधवारी रात्री 10 वाजल्यापासूनच मनपा चे 70-80 कर्मचारी व अधिकारी पोलीस बंदोबस्त उपलब्ध होण्याची प्रतिक्षा करीत तोफखाना पोलीस ठाण्याच्या आवारात जमले  होते.प्रत्यक्षात गुरूवारी पहाटे 2 वाजता पोलीस अधिकारी कर्मचारी बंदोबस्तासाठी उपलब्ध झाल्यानंतर मनपा कर्मचारी व पोलीस एकित्रतपणे कारवाईसाठी रवाना झाले.उच्च  न्यायालयाच्या आदेशानुसार ही कारवाई शहरात पुन्हा एकदा सुरू करण्यात आली आहे. काही धार्मिक स्थळांबाबत आक्षेप घेण्यात आले असून त्या संदर्भात समितीद्वारा विचार केला  जात आहे.मात्र कोणत्याही प्रकारचा आक्षेप नसणारी तसेच समितीने निश्‍चित केलेली धार्मिक स्थळे काढण्याची कारवाई सुरू करण्यात आली आहे.कारवाईच्या वेळी काही प्रमाणात  विरोध होण्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती.त्यानुसार सहाय्यक अधिक्षक शिंदे यांनी संपूर्ण प्रकरणाची बारकाईने माहिती घेऊन विरोध होण्यापूर्वीच काही जणांना ताब्यात  घेतले.त्यामुळे कारवाई पूर्णपणे शांत वातावरणात पार पडली.