आंदोलन दखल न घेतल्यास मंत्र्यांच्या गाड्या अडवणार : चित्रा वाघ
पुणे : सरकारची कर्जमाफी म्हणजे भीक नको पण कुत्रे आवर, अशी झाली आहे. लोकशाही मार्गाने आंदोलन करणार्या शेतकर्यांवर गोळीबार करण्याचे काम करणार्या सरकारला व मुख्यमंत्र्याना जमिनीवर आणण्याची वेळ आल्याचे, मत राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेश अध्यक्षा चित्रा वाघ यांनी व्यक्त केले आहे.
यावेळी वाघ यांनी या सरकारकडून संपकरी शेतकर्यांच्या मागण्यांची दखल घेतली जात नसल्याचा आरोप करत, येत्या 22 नोव्हेंबरला राष्ट्रवादी काँग्रेस रस्त्यावर उतरून मंत्र्यांच्या गाड्या अडवणार असल्याची माहिती वाघ यांनी दिली.कानगाव येथील शेतकर्यांनी संपूर्ण कर्जमाफी, शेतीमालाला हमीभाव यासह आदी 11 मागण्यांसाठी 2 नोव्हेंबरपासून बेमुदत संप पुकारला आहे.
आज या शेतकरी संपाचा सतरावा दिवस आहे. या आंदोलक शेतकर्यांना भेटत त्यांच्या मागण्या चित्रा वाघ यांनी जाणून घेतल्या. त्यावेळी त्या बोलत होत्या.
भाजपकडून या आंदोलनाला पाठिंबा असल्याचे सांगण्यात येत आहे. मग या शेतकर्यांनी न्याय कोणाकडे मागायचा, असा प्रश्न वाघ यांनी उपस्थित केला.
या सरकारला तीन वर्षे झाले तरी अजून हे सरकार अभ्यासच करते आहे. तेलगंणा हे नवीन राज्य असूनही शेतीला वीज मोफत देते. परंतु महाराष्ट्रात मोफत वीज तर सोडा मात्र भरमसाठ बील देण्याचे काम या सरकारने केल्याचा आरोप त्यांनी यावेळी वाघ यांनी केला. कानगावच्या आंदोलनाची सरकारने दखल न घेतल्यास राष्ट्रवादी काँग्रेस रस्त्यावर उतरून मंत्र्यांच्या गाड्या अडवणार असल्याचा इशारा यावेळी चित्रा वाघ यांनी दिला.
