Breaking News

रासपच्या पश्‍चिम महाराष्ट्र सरचिटणीस पदी प्रकाश खरात यांची निवड

सातारा, दि. 6 (प्रतिनिधी) : राष्ट्रीय समाज पक्षाचे काम वाढत असताना तळागाळात काम करणार्‍या नव्या उमेदीच्या तरुणांना पक्ष नेतृत्व विविध जबाबदार्‍या देत आहे. त्याप्रमाणे पश्‍चिम महाराष्ट्राच्या सरचिटणीस पदी सातार्‍याचे माजी जिल्हाध्यक्ष प्रकाश खरात यांची निवड माणिकराव दगडे-पाटील यांनी केली. संघटना वाढीसाठी पश्‍चिम महाराष्ट्रात नवीन नियुक्त्या देताना पक्षाची ध्येय धोरणे सर्वसामान्य माणसापर्यंत पोहचवण्याचे काम यापुढील काळात अधिक जोमाने करणार असल्याचे खरात यांनी स्पष्ट केले. सातार्‍यातील शासकीय विश्रामगृहात नियुक्तीपत्र देताना प्रदेशाध्यक्ष दादासाहेब केसकर, कार्यकारीणीचे नितीन धायगुडे, भाऊसाहेब वाघ, जिल्हाध्यक्ष मामाशेठ वीरकर, युथ जिल्हाध्यक्ष श्रीकांत देवकर उपस्थित होते.
दगडे-पाटील म्हणाले, राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष ना. महादेव जानकर कार्यकर्त्याला ताकद देणारे नेतृत्व आहे. समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी अहोरात्र कष्ट घेताना संघटना बांधणीच्या कामात जोमाने युवा चळवळ उभी राहत आहेत. या वर्षात शासनाच्या माध्यमातून अनेक लोकाभिमुख निर्णय घेण्यात आले. डोंगरी भागातील लोकांसाठी सुविधा देताना विविध उपक्रम राबवले जात आहेत. दुग्ध विकास व अप्षु संवर्धन या खात्याच्या माध्यमातून समाजाचे अनेक प्रश्‍न मार्गी लागले असले तरी आरक्षण आणि बहुतांश प्रश्‍न अद्याप शासनाच्या विचाराधीन आहेत. तरुणांचा पक्ष संघटनेत वाढता सहभाग असताना सातार्‍याचे माजी जिल्हाध्यक्ष प्रकाश खरात यांची पश्‍चिम महाराष्ट्राच्या सरचिटणीस पदी निवड झाल्याने पुढील काळात पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी अधिक जोमाने काम करण्याची जबाबदारी त्यांच्यावर असणार आहे. वंचित-उपेक्षित घटकातील लोकांसाठी काम करणारा पक्ष अशी रासपची ओळख असल्याने लोकांच्या प्रश्‍नांवर काम करत संघटन वाढवणार आहे. यापुढे गटबाजीला कोणताही थारा देणार नसून ना. जानकार यांच्या विचारला लोकांच्यात रुजवण्याचे काम करणार असल्याचे खरात यांनी स्पष्ट केले. निवडीनंतर विकास शिंदे, संतोष ठोंबरे, नितीन खरात, सचिन सुपेकर, खंडेराव सरक आणि कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त केला.