Breaking News

गैरव्यवहाराच्या चौकशीतून सवलत मिळण्यासाठी ‘त्यांची’ धडपड

अहमदनगर, दि. 01, नोव्हेंबर - शिंगणापूर देवस्थान व अण्णाभाऊ साठे महामंडळात असलेल्या गैरव्यहाराची चौकशी अंतिम टप्यात असतांना संशयित असणार्‍यांनी सवलत मिळावी, यासाठीच केंद्रीयमंत्री ना. नितीन गडकरी यांच्या दौर्‍यात भाजपा नेत्यांच्या पुढेपुढे केलेली धडपड या दौर्‍यात दिसून आले, अशी टीका भाजपा तालुकाध्यक्ष माऊली पेचे यांनी माजी आ. शंकरराव गडाखांचा नामोल्लेख टाळून केली आहे.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या शिर्डी-शिंगणापूर दौर्‍याबाबतचे राजकीय कुरघोड्या करणारी निवेदने गेले दोन दिवसापासून सुरु आहेत. शिंगणापूर देवस्थानला मंत्र्यांच्या दौर्‍यामध्ये वेळ ठेवण्यात आला होता. तसेच ते गडाखांनाही वेळ देणार असल्याचे सांगण्यात आले होते. परंतु प्रत्यक्षात मात्र शिंगणापूर देवस्थानच्यावतीने गडकरी यांचा घाईघाईत सत्कार घेण्यात आला. यापार्श्‍वभूमीवर राजकीय टीका करतांना तालुकाध्यक्ष पेचे यांनी सदर पत्रक प्रसिद्धीला दिले आहे.
यात पेचे यांनी म्हटले आहे, की केंद्रीयमंत्री ना. गडकरींचा दौरा पक्षाच्या प्रोटोकॉलप्रमाणे झाला. विरोधक हे दलबदलू व कोणत्याही पक्षाची शिस्त न पाळणारे असल्याने त्यांना पक्षाची शिस्त माहिती नाही. शनीशिंगणापूर देवस्थानच्या भ्रष्टाचाराची चौकशी अंतिम टप्प्यात आल्याने यातून सुटका व्हावी, यासाठी भाजपच्या मंत्र्यांच्या पुढेपुढे करण्याचा गडाखांचा डाव फसला.
आण्णाभाऊ साठे महामंडळ घोटाळा, शिंगणापूर देवस्थानचा गैरकारभार, मागील पंचवार्षिकमध्ये आमदार निधीचा घोटाळा, कारखाना भाग विकास निधीचा घोटाळा, बाजार समितीचा घोटाळा तसेच सहकार बँक घोटाळ्यामध्ये सामील असलेल्या गडाखांना मागील पाच वर्षात आदरणीय शरद पवारांमुळे संरक्षण मिळाले होते. परंतु या घोटाळ्यांमुळे त्यांना घोटाळ्यांचा महामेरू म्हटल्यास वावगे ठरणार नाही. भ्रष्टाचार व घोटाळ्यामुळे ज्यांना नेवासा तालुक्याने घरी बसवले त्यांना आमदार मुरकुटेंवर बोलण्याचा अधिकार नाही, अशी टीका भाजपा तालुकाध्यक्ष ज्ञानेश्‍वर पेचे यांनी केली आहे.
मागील तीन वर्षात आ. बाळासाहेब मुरकुटे यांनी 250 ते 300 कोटीचा निधी आणून तालुक्यातील विकासकामाचा डोंगर उभा केला आहे. या कामाची घोडदौड पाहता विरोधकांच्या पायाखालची वाळू घसरली आहे. आमदारकी पुन्हा मिळणे कठीण असल्याने आपले भ्रष्टाचार उघड होऊ नये व त्यात सवलत मिळावी, यासाठी भाजपा पदाधिकारी व मंत्र्यांच्या पुढेपुढे करण्याची कोणतीही संधी विरोधक सोडत नाहीत. तशीच धडपड याही दौर्‍यात दिसून आली.