Breaking News

‘प्रहार’ने काढली आरोग्य प्रशासनाची शवयात्रा

बुलडाणा, दि. 07, नोव्हेंबर - उपचारासाठी येणार्‍या रुग्णांसाठी धाड ग्रामीण रुग्णालय यमसदन ठरले आहे. रुग्णालयात निर्माण झालेल्या समस्यांकडे शासन व प्रशासनाचे लक्ष  वेधण्यासाठी प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने आज 6 नोव्हेंबर रोजी अभिनव आंदोलन करण्यात आले. यावेळी शासनाविरोधात गगनभेदी घोषणाबाजी करीत लोकप्रतिनिधींसह  आरोग्यमंत्र्याची प्रतिकात्मक शवयात्रा काढण्यात आली. रुग्णालय परिसरातच जिल्हाप्रमुख वैभवराजे मोहिते, उपजिल्हाप्रमुख राणा संजय इंगळे, निलेश गुजर व तालुका प्रमुख प्रदीप  टाकसाळ यांनी भडाग्नी दिली तर याचवेळी रुग्णालयात शेकडो कार्यत्र्यांनी स्वत: ला कोंडून घेत शोक व्यक्त केल्याने आंदोलनस्थळी एकच खळबळ उडाली. या हटके आंदोलनामुळे  पोलिसांसह विविण यंत्रणांची चांगलीच धावपळ झाल्याचे दिसून आले. दरम्यान पोलिसांनी आंदोलकांवर बळाचा वापर केल्याने काहीकाळ तणाव निर्माण झाला.
धाड व परिसरातील 52 गावातील नागरीकांना मुबलक आरोग्यसेवा मिळावी म्हणून धाड येथे प्रशस्त ईमारतीत 30 खाटांचे ग्रामीण रुग्णालय सुरु करण्यात आले. मात्र या रुग्णालयात  उपचारासाठी येणार्‍या रुग्णांना सुरुवातीपासूनच समस्यांचा सामना करावा लागत आहे. आजही रुग्णालयात अनेक समस्या कायम असून उपचाराअभावी कहीकांना आपले प्राण  गमवावे लागल्याचे उदारणे आहेत. त्यामुळे रुग्णालयात रिक्त असलेले वैद्यकीय अधिकार्‍याचे पद भरण्यात यावे, सद्यास्थितीत केवळ सकाळी होणारी होणारी ओपीडी सकाळ व  सायंकाळी शासनाने ठरवून दिलेल्या वेळेवरच घेण्यात यावी, मंजुर करण्यात आलेले रक्त साठवणूक केंद्र तत्काळ सुरु करण्यात यावे, एक्स-रे व सोनोग्राफीची व्यवस्था करण्यात  येवून दंततज्ज्ञ व प्रयोगशाळा तंत्रज्ज्ञाच्या रिक्त असलेल्या जागा भरण्यात याव्यात, साहित्या अभावी बंद असलेला शस्त्रक्रिया विभाग सुरु करण्यात येवून छोट्या-मोठ्या  शस्त्रक्रीयांसोबतच कुटुंबनियोजन शस्त्रक्रिया याच ठिकाणी करण्यात याव्यात, अशा मागण्या प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने जिल्हाशल्यचिकित्सकांकडे करण्यात आल्या होत्या.
मात्र सदर मागण्यांकडे शासन व प्रशासनाने नेहमीप्रमाणे दुर्लक्ष केल्याने मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी ’प्रहार’ जिल्हाप्रमुख वैभवराजे मोहिते व  उपजिल्हाप्रमुख राणा संजय  इंगळे यांच्या उपस्थितीत तसेच उपजिल्हाप्रमुख निलेश गुजर यांच्या नेतृत्वात आज 6 नोव्हेंबर रोजी धाड येथे लोकप्रतिनिधींसह आरोग्यमंत्र्यांची प्रतिकात्मक शवयात्रा काढण्यात  आली. स्थानिक मारोती मंदिरापासून सुरुवात करण्यात आलेली शवयांत्रा एक किलोमिटरची परिक्रमा करुन ग्रामीण रुग्णालयात पोहचली. या ठिकाणी उपरोक्त शवांना जिल्हाप्रमुख  वैभवराजे मोहिते, उपजिल्हाप्रमुख राणा संजय इंगळे, निलेश गुजर व तालुका प्रमुख प्रदीप टाकसाळ यांच्याहस्ते भडाग्णी देण्यात आली. शासन, प्रशासन व लोकप्रतिनिधी विरोधात  प्रचंड घोषणाबाजी करण्यात आली. त्यानंतर आंदोलनकर्त्यांनी स्वत:ला रुग्णालयात कोंडून घेत शोक व्यक्त केला. तसेच समस्या मार्गी लागेस्तोवर बाहेर निघणार नसल्याचा भुमिका  घेतल्याने प्रशासनाची चांगलीच तारांबळ उडाली. यावेळी पोलिसांनी आंदोलनकत्र्यांवर दबाबतंत्राचा वापर करत आंदोलन दाबण्याचा प्रयत्न केल्याने काहीवेळ तणाव निर्माण  झाला.दरम्यान पोलिसांनी जिल्हाप्रमुख वैभवराजे मोहिते, उपजिल्हाप्रमुख राणा संजय इंगळे, निलेश गुजर, दिलीप ठाकरे, सोमनाथ आदे, अजय संतापे, सुभाष मोहिते, शुभम पांदे,  सुनील जट्टे यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल केले आहेत.